‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:01 PM2017-10-30T22:01:14+5:302017-10-30T22:01:31+5:30

वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

The existence of 'Vasant' in danger | ‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देगळीत हंगामावर प्रश्नचिन्ह : ३० महिन्यांपासून वेतनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या या कारखान्यातील कामगारांना गत ३० महिन्यांपासून वेतन नाही. भाजपाने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिस्थितीत तसूभर सुधारणा झाली नाही.
पुसद, उमरखेड, महागाव यासह मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना कामधेनू आहे. १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झाला. २०१५ पर्यंत या कारखान्याने सलग गाळप केले. त्यामुळे परिसरात समृद्धी आली. ऊस उत्पादक कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. गत काही वर्षापासून कारखान्याला उतरती कळा लागली. कामगारांचे देणे थकीत होत गेले. गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही.
या कारखान्याची अवस्था बघता निवडणूक अविरोध करून माजी आमदार माधवराव पाटील यांना अध्यक्ष तर कृष्णा देवसरकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी गतवर्षी कसाबसा गाळप हंगाम सुरू केला. परंतु कारखान्याच्या इतिहासातील निच्चांकी गाळप गतवर्षी करण्यात आले. कामगारांनी वेतनासाठी आंदोलन केले. त्याचदरम्यान ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्यात आले. परंतु कारखान्याची आर्थिकस्थिती सुधारली नाही. दरम्यान वसंतच्या अध्यक्षपदाचा माधवराव पाटलांनी राजीनामा दिला.
भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्ष झाले. भाजपची सत्ता असल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अद्यापही गळीत हंगाम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. शासनानेही कोणतीही मदत केली नाही. परिणामी कारखाना बंद आहे. कारखान्याला कायमचे टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

दिवाळीही गेली अंधारात
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना ३० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऊस उत्पादकांनाही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कामगारांसोबतच या भागातील शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कारखाना कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The existence of 'Vasant' in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.