‘एक्झिट पोल’ने काँग्रेसमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:29 PM2019-05-20T21:29:48+5:302019-05-20T21:30:51+5:30
चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली हे तीन लोकसभा मतदारसंघ जिल्ह्याशी संबंधित आहे. या तिन्ही मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा प्रचारात व मतदानानंतरसुद्धा काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. सर्वत्र मोदीविरोधी वातावरण आहे व त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगितले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली हे तीन लोकसभा मतदारसंघ जिल्ह्याशी संबंधित आहे. या तिन्ही मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा प्रचारात व मतदानानंतरसुद्धा काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. सर्वत्र मोदीविरोधी वातावरण आहे व त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगितले जात होते. शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी सायंकाळी आपले ‘एक्झिट पोल’ अर्थात मतदानोत्तर अंदाज वर्तविले. त्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाच्या नेतृत्वात मुसंडी मारेल, असे दाखविले गेले. महाराष्ट्रात युतीला ३८ ते ४० जागा दाखविल्या जात आहे. शिवसेनेला २० ते २२ जागा सांगितल्या गेल्या आहे. तर काही वाहिन्यांनी काँग्रेसला केवळ ० ते १ जागा एवढी वाईट परिस्थिती दाखविली आहे. काही वाहिन्या काँग्रेस व राष्ट्रवादीला चार ते आठ जागा मिळतील, असे सांगितले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली या तिन्ही जागा भाजप-शिवसेना युतीला दाखविल्या जात आहे. ‘एक्झिट पोल’चे हे अंदाज पाहून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्याचवेळी या ‘एक्झिट पोल’वर काँग्रेसचे कार्यकर्ते तोंडसुखही घेताना दिसत आहे. २३ मेनंतर ईव्हीएम घोटाळ्याची ओरड होऊ नये म्हणून आताच भाजपला फायदेशीर ठरतील, असे ‘एक्झिट पोल’ दाखविले जात असल्याचा सूरही काँग्रेस कार्यकर्ते आळवत आहे.
या ‘एक्झिट पोल’मुळे भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे. २३ मे रोजी केव्हा एकदाची मतमोजणी होते आणि विजयाचा जल्लोष साजरा करतो, असे या कार्यकर्त्यांना झाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही चर्चेतून आढावा घेताना दिसत आहेत. त्याचवेळी २३ मेनंतर प्रतक्षात वेगळेच चित्र पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोदींनी देशाचे वाटोळे केले, मोदींविरोधात नोटबंदी, जीएसटीमुळे प्रचंड लाट आहे, काँग्रेसला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे आगामी सरकार हे काँग्रेसचेच असेल, असा दावा करणाऱ्या काँग्रेसचा रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल’ने पुरता भ्रमनिरास केला आहे. यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित लोकसभेच्या तिन्ही जागा भाजप-सेना युतीला दाखविल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता तर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.
विविध वाहिन्यांचे जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’ २३ मे रोजी ‘उघडे’ पडतील व जनतेचा खरा कौल कळेल. या पोलवर कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्याबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात आहे. पोल सांगते तसा निकाल निश्चितच लागणार नाही. काँग्रेसचा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ चार जागा दाखविल्या जात आहे. हे शक्यच नाही. यवतमाळ-वाशिमच्या जागेवरही काँग्रेसच विजयी होईल.
- माणिकराव ठाकरे
माजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसचे उमेदवार, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ
जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’ आम्हाला मान्य नाही. ते किती बोगस आहे हे २३ मे रोजी स्पष्ट होईलच. काँग्रेसच सत्तेवर येईल व पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. आजही भाजप सरकारविरोधात जनतेत नाराजी आहे. जिल्ह्याची जुळलेल्या लोकसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील.
- आमदार डॉ.वजाहत मिर्झा
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ
‘एक्झिट पोल’ जो अंदाज वर्तवित आहे, प्रत्यक्षात तसे निकाल येणार नाहीत. भाजपविरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीला निश्चित मिळेल. जिल्ह्याशी संबंधित लोकसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल.
- आमदार ख्वाजा बेग
अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ