‘पेजप्रमुख’ मोहिमेच्या माध्यमातून पक्षविस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:02 AM2017-10-09T01:02:16+5:302017-10-09T01:03:36+5:30
लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकांमध्ये एकहाती यश मिळाल्यावरदेखील भाजपच्या पक्षविस्ताराला पक्षश्रेष्ठींना अपेक्षित यश मिळालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकांमध्ये एकहाती यश मिळाल्यावरदेखील भाजपच्या पक्षविस्ताराला पक्षश्रेष्ठींना अपेक्षित यश मिळालेले नाही. ‘बूथविस्तारक’ योजना राबविल्यानंतर आता भाजपातर्फे ‘पेजप्रमुख’ मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील मतदारांची संख्या लक्षात घेता मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक प्रमुख नेमण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची फौज लागणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पक्षाच्या विस्तारावर भर देण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. रविवारी भाजपच्या शहर पदाधिकाºयांच्या बैठकांचे सत्र चालले व काहीशा सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद भरण्यासाठी ‘पेजप्रमुख’ मोहीम पुढील आठवडाभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
मनपा निवडणुकांच्या वेळची स्थिती लक्षात घेतली तर नागपूर शहरातील मतदारांची एकूण संख्या २० लाख ९३ हजार ३९२ इतकी होती. मतदार यादीतील एका पानावर सुमारे ३० मतदारांची नावे असतात. अशा स्थितीत संपूर्ण मतदार यादीसाठी ६९ हजार ७८० पेजप्रमुख नेमावे लागणार आहेत. यासाठी सक्षम कार्यकर्ते लागणार आहेत. शहरातील काही भागांमधील ‘बूथ’वर कार्यकर्त्यांची कमतरता आहे हे वास्तव आहे. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना पक्षात घेताना त्यांच्याकडे जबाबदारी देऊन विश्वास निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. या माध्यमातून पक्षविस्तारदेखील होईल व नवे कार्यकर्तेदेखील जुळतील, अशा पद्धतीने प्रयत्न करण्याचे निर्देश शहराध्यक्षांकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, रविवारी गणेशपेठस्थित पक्ष कार्यालयात चार वेगवेगळ्या बैठका पार पडल्या. यात शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, महामंत्री, विस्तारक, प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला आघाडी यांचे पदाधिकारी समाविष्ट होते. विविध पातळ््यांवर बैठका घेऊन पेजप्रमुख मोहिमेसंदर्भात सूचना देण्यात आल्या. १५ आॅक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. पूर्व, दक्षिण व मध्य नागपूरची जबाबदारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे तर उत्तर, पश्चिम व दक्षिण-पश्चिमची जबाबदारी जयप्रकाश गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रविवारी झालेल्या बैठकांमध्ये शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, संदीप जाधव, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुम्बे, दयाशंकर तिवारी, प्रमोद पेंडके, महिला आघाडी अध्यक्षा डॉ.किर्तीदा अजमेरा, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी यांच्यासह विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘वॉररुम’सोबत जोडणार ‘पेजप्रमुख’
शहरातील १ हजार ९१४ बूथवर ‘पेजप्रमुख’ बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक ‘बूथ’वर साधारणत: २५ कार्यकर्ते लागणार आहेत. या पेजप्रमुखांची पडताळणी झाल्यानंतर मुंबईत पक्षाने स्थापन केलेल्या ‘वॉररुम’कडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल. विशेष म्हणजे ही ‘वॉररुम’ची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे.