राज्यात एक कोटी रुईगाठींची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:12 AM2018-09-12T11:12:24+5:302018-09-12T11:16:37+5:30
राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत.
देशभरात दरवर्षी एक कोटी १४ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा होतो. यावर्षी त्यात दोन लाख हेक्टरची घट झाली आहे. परंतु त्यानंतरही कपाशीच्या उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम पडणार नाही. कारण शासनाने बी-बियाण्यांमध्ये विविधता उपलब्ध करून दिली. पाऊस चांगला आहे. निवडक क्षेत्र वगळता बोंडअळीचा प्रकोप तेवढा नाही. त्यामुळे यावर्षी देशभरात तीन कोटी ७५ लाख रुईगाठींच्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दहा लाख गाठींची भर पडणार आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक कोटी गाठींचा आहे. गेल्यावर्षी राज्यात ८० ते ८५ लाख गाठी झाल्या होत्या. यावर्षी त्यात भर पडणार आहे. राज्यात कपाशीचे क्षेत्र ४२ लाख हेक्टरवर विस्तारले आहे.
केंद्र शासनाने कापसाला पाच हजार ४०० रुपये प्रति क्ंिवटल हमी भाव जाहीर केला आहे. परंतु कॉटन, टेक्सटाईल, जिनिंग, स्पिनिंग या क्षेत्रातील मंदीच्या लाटेमुळे सर्व उद्योग डबघाईस आले आहे. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भावापेक्षा फार अधिक दर मिळण्याची शक्यता नाही. एवढ्या जास्त हमी भावात कापसाची निर्यात शक्य होत नाही. तर दुसरीकडे देशात टेक्सटाईल उद्योग थंड पडल्याने रूईगाठींना तेवढी मागणी राहणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय), नाफेड मार्फत पणन महासंघ यावरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहे.
कॉटन उद्योग डबघाईस
गेल्या वर्षीही बाजारात चांगल्या कापसाला पाच हजार ५०० रुपयांचा भाव होता. डॉलरच्या भावात होणारी वाढ लक्षात घेता काही प्रमाणात रूईगाठींची निर्यात होण्याची शक्यताही कॉटन उद्योजक व्यक्त करीत आहे. मंदीच्या लाटेमुळे जिनिंग, प्रेसिंग, सहकारी सूत गिरण्या, कापड उद्योग डबघाईस आले आहे. मोठ्या उद्योगातही तीन ऐवजी एक शिप्ट चालविली जात आहे. यावरून या इंडस्ट्रीजची गती व स्थिती लक्षात येते.