घाटंजीत विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:34+5:302021-09-11T04:43:34+5:30
ग्राऊंड रिपोर्ट भाग २ विठ्ठल कांबळे फोटो घाटंजी : गेल्या अनेक वर्षांत शहराचा जेवढा विकास झाला नाही, ...
ग्राऊंड रिपोर्ट भाग २
विठ्ठल कांबळे
फोटो
घाटंजी : गेल्या अनेक वर्षांत शहराचा जेवढा विकास झाला नाही, तो विकास आम्ही केवळ अडीच ते तीन वर्षात केला, असा दावा नगरपरिषदच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही नागरिकांना अनेक विकासात्मक कामांची अपेक्षा आहे.
घाटंजीकरानी आम्हाला पाच वर्षांसाठी सेवेची संधी दिली. परंतु मध्यंतरी असलेल्या मुख्याधिकारी यांच्या असहकार्यामुळे एक वर्ष, तर कोरोना संकटाने एक वर्ष, असे दोन वर्षे वाया गेली. तरीही आम्ही उर्वरित तीन वर्षांत ३० वर्षांचे रेकॉर्ड काम केल्याचा दावा सत्ताधारी करीत आहे. आम्हाला पाच वर्षे मिळाली असती, तर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला असता, असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
सात कोटी रुपये खर्च करून शहराच्या विकासात भर पाडणारी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून रस्त्याची कामे करण्यात आली. घाटी प्रभागात एक कोटी रुपयांच्या नाल्या बांधल्या. दलित वस्ती योजनेअंतर्गत इंदिरा आवास येथे सिमेंट रोडची कामे केल्या गेली. आदिवासी बांधवांना जाळीचे कंपाउंड बांधून दिले. त्यांच्या सांस्कृतिक भवनाकरिता आनंदनगर येथे जवळपास एक एकर जमीन दिली. वसंतनगर येथे खुल्या जागेपैकी १० टक्के जागा देण्यात आली.
शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शासनाकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त केल्या. केवळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचे ना हरकत प्रमाणपत्र शिल्लक आहे. ते मिळताच महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येणार आहे. कब्रस्थान येथे ईदगाहचे काम व सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मशानभूमी विकासाचे काम करण्यात आले. त्यावर ६० लाख खर्च करण्यात आले.
बॉक्स
या समस्यांकडे द्यावे लागणार लक्ष
१) पाणीपुरवठा ही समस्या महत्त्वाची आहे. सोबत नाल्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे, कचऱ्यांची त्वरित विल्हेवाट लावणे, नवीन वसाहती मध्ये रस्ते, नाल्या, मूलभूत गरजा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
२) शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकांचा विळखा आहे. त्यात लोक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्किंग करतात. मोकाट गुरेही रस्त्यात बसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बगीचे ओसाड पडले आहे. त्यांना फुलवावे, अशी अपेक्षा आहे.
५५ कोटींच्या डीपीआरला मान्यता मिळणे बाकी
कोट
शहरात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पाणी पुरवठा इमारत व ती योजना १९७२ ची आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण अंतर्गत पाईप लाईन कुजलेली आहे. त्यातील सर्व मशिन, त्यांचे सुटे भाग कालबाह्य झाल्याने ५५ कोटीचा डीपीआर तयार आहे. केवळ शासनाकडून त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे आहे.
नयना ठाकूर, नगराध्यक्ष, घाटंजी
कोट
घनकचरा निविदा काढण्यात येणार आहे. पाणी पुरवठा योजना तांत्रिक मान्यतेसाठी पाठवलेली आहे. उर्दू शाळेकरिता ४ काेटी ४ लाखांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. बरीच कामे झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा ५ टक्के निधी वाटप, बचत गटांना फिरता निधी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देणे सुरु आहे. अजूनही काही कामे सुरु असून, ती प्रगती पथावर आहे.
अमोल माळकर, मुख्याधिकारी, घाटंजी