खनीज विकास निधीतून विकासाची अपेक्षा
By admin | Published: May 27, 2017 12:19 AM2017-05-27T00:19:43+5:302017-05-27T00:19:43+5:30
खाण व खनिजे (विकसन व विनियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ (ब) उपकलम १ च्या तरतुदीनुसार
खनीज विकास प्रतिष्ठानला महत्त्व : पहिल्याच सभेत सूचविली अनेक विकासकामे
विनोद ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : खाण व खनिजे (विकसन व विनियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ (ब) उपकलम १ च्या तरतुदीनुसार राज्य शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्याकरिता खनिज विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. खनिज बाधित क्षेत्राचा विकास करण्याकरिता हे प्रतिष्ठान काम करणार आहे. या प्रतिष्ठानात वणी विभागातून दोन सदस्य देण्यात आल्याने वणीकरांच्या विकासाच्या खनिज विकास निधीतून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रतिष्ठानच्या १८ मे रोजी झालेल्या पहिल्याच सभेत सदस्य विजय पिदूरकर यांनी खनिज बाधित क्षेत्रातील अनेक कामे सूचविली आहे.
वणी विभाग हा खनिजाचे आगार आहे. दगडी कोळसा, डोलोमाईट, चुनखडी, गिट्टीच्या अनेक खाणी या परिसरात आहे. या खनिजाच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या रॉयल्टीच्या १० टक्के निधी जिल्ह्याला खनिज विकास निधी म्हणून शासन प्रदान करते. यामध्ये वणी तालुक्याचा सर्वाधिक वाटा असतो. केंद्र शासनानेही खनिज बाधित क्षेत्राचा विकास करण्यासाठी पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजना सुरू केली आहे. खनिज बाधित क्षेत्र म्हणजे खाणीपासून २० किलोमीटर क्षेत्र समजले जाते. जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान २/३ निधी खाण बाधित क्षेत्रामध्ये खर्च करण्याचे बंधनही आहे. याचाच लाभ वणी विभागाला मिळणार आहे. ६० टक्के निधी उच्च प्राथमिक बाबींवर खर्च करण्यात यावा, असे मार्गदर्शक तत्व आहे. यामध्ये पाणी पुरवठा यंत्रणा, पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींचे कल्याण, कौशल्य विकास, स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. तर ४० टक्के निधी रस्ते, पुल, जलसंपदा, उर्जा व पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, या बाबींवर खर्च करता येतो. याचे नियोजन खनिज विकास प्रतिष्ठान करणार आहे.
यवतमाळ जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानचे पालक मंत्री मदन येरावार हे अध्यक्ष आहेत. खनिकर्म अधिकारी हे सचिव आहेत. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नजरधने व अशोक उईके यांच्यासह प्रा.सुरेश चोपणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, डोलोमाईट खाणीच्या संचालिका सीमा बोरकर, वेकोलिचे महाप्रबंधक हे या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. यांपैकी आमदार बोदकुरवार, पिदुरकर, चोपणे, बोरकर हे वणीचे सदस्य असल्याने वजन अधिक राहणार आहेत. १८ मे रोजी या प्रतिष्ठानची पहिली सभा पार पडली. या सभेत सदस्य विजय पिदुरकर यांनी वणीच्या खाण बाधित क्षेत्र विकासासाठी अनेक उपाययोजना सूचविल्या. त्यामध्ये खाण बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, शेतमजुर व इतर मजुरांना सुरक्षित कपडे व मास्क पुरविणे, मामा तलावांचे खोलिकरण करणे, खनिज वाहतूक रस्त्यावर वृक्षारोपण करणे, वेकोलि खाणीतील पाणी गुंज नाल्यात सोडून या नाल्याचा विकास करणे, जेणेकरून या नाल्याचे पाणी सिंचनासाठी वापरता येईल. खुल्या जागांचे सौंदर्यीकरण करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगासाठी गावोगावी विश्रामगृह बांधणे, कौशल्य विकास कार्यक्रमात बेरोजगार युवकांना व्हॉल्वो चालकाचे प्रशिक्षण आयटीआयमार्फत देणे, ग्रामीण रूग्णालयात सुसज्ज पॅथालॉजी लॅब सुरू करणे, बाधित गावांच्या नळ योजना सुरू करणे, या कामांचा समावेश आहे.