उजाड उद्यानांवर महिन्याकाठी दीड लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:49 PM2019-01-30T23:49:42+5:302019-01-30T23:53:26+5:30
शहरातील प्रमुख नऊ उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने दिले आहे. आतापर्यंत यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष कोणतीच सुविधा या उद्यानांमध्ये नाही. महिन्याकाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च होत असलेल्या उद्यानांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील प्रमुख नऊ उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने दिले आहे. आतापर्यंत यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष कोणतीच सुविधा या उद्यानांमध्ये नाही. महिन्याकाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च होत असलेल्या उद्यानांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे. यावर कोणीही आजतागायत आक्षेप घेतला नाही. स्वच्छ सुंदर शहर याचा गजर करणाऱ्या पालिकेचे उजाड उद्यानाक डे कधी लक्ष गेले नाही. इतकेच नव्हे तर काम होत नाही म्हणून कोणत्याच कंत्राटदाराची देयके थांबविली नाही. हिवाळ््यात ही उद्याने सुकली आहे. कोणतीच सुविधा येथे नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी उद्यानाची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. येथील खेळणी पूर्णत: तुटली आहे. लॉन सुकले, येथे लावलेल्या शिवाजी महाराजांच्या तैल चित्राची दुरावस्था आहे. एकीकडे कायम आर्थिक टंचाईत असल्याचे सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने या उजाड उद्यानावर महिन्याला २४ हजार ५०० रुपये खर्च झाल्याचे दाखवून देयके काढली आहे. कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती नेहरू बाल उद्यानाची आहे. त्यावर महिन्याला २४ हजार ८५० रूपये खर्च केला जातो. नेहरू मंचावर १३ हजार ५०० रूपये, वॉर्ड क्रमांक ३४ शास्त्रीनगर येथील उद्यानावर १७ हजार ३०० रूपये, आयुर्वेदिक दवाखान्यावर १४ हजार ८००, शिंदे प्लॉट उद्यानावर १६ हजार ९००, अग्रवाल ले-आऊट उद्यानावर १६ हजार ७००, पत्रकार कॉलनी उद्यानावर १४ हजार ५०० रुपयांचा खर्च होत आहे. एकूण उद्यानावर महिन्याला एक लाख ६० हजार रूपये खर्च केले जात आहे. वर्षभरात नगरपरिषद नियोजन विभागाने १९ लाख १७ हजार रूपये उद्यान देखभालीवर खर्च केले आहेत. त्यानंतरही येथील बहुतांश उद्याने उजाड आहेत. स्थानिक नगरसेवकही प्रभागातील उद्यानाकडे फिकरत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होते.
शहरातील शिवाजी उद्यानाची स्थिती बिकट आहे. याप्रमाणेच इतर उद्यानाची पाहणी करून दोष कुणाचा याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.
- शुभांगी हातगावकर
सभापती नियोजन समिती
नगरपरिषद, यवतमाळ