महागड्या मुद्रांकांचा सामान्यांना फटका; योजनांचा भार मध्यमवर्गीयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:44 PM2024-10-07T17:44:55+5:302024-10-07T17:47:02+5:30

Yavatmal : शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी ५०० रुपयांचा मुद्रांक

Expensive stamps hit the common man; The burden of the schemes on the middle class | महागड्या मुद्रांकांचा सामान्यांना फटका; योजनांचा भार मध्यमवर्गीयांवर

Expensive stamps hit the common man; The burden of the schemes on the middle class

लोकमत न्यूज नेटवर्क 
वणी :
महसूल वाढीसाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून थेट ५०० रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र व शपथपत्रासाठी ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर करावा लागणार आहे. यातून शासनाचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र १००, २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मात्र, शासकीय कामांसाठी मुद्रांक पेपरची माफी कायम ठेवली आहे.


महायुती सरकारने अनेक योजनांचा धडाका लावल्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी व महसूल वाढावा यासाठी मुद्रांक अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी नागरिकांना शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र भुर्दंड सहन करावा लागणार आहे. घर किंवा खोली भाड्याने देताना करावा लागणाऱ्या करारासाठीही ५०० रुपयांचाच मुद्रांक लावावा लागणार आहे.


तसेच यापूर्वी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होत होते. ते आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लावावे लागेल, तसेच विविध शासकीय कामांसाठी कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. कारण १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्पचा वापर बंद केला जाणार आहे. यामुळे जी कामे १०० किंवा २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरमध्ये होत होती, ती कामे करण्यासाठी वणी तालुक्यातील नागरिकांना आता ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी होणार आहे; पण या निर्णयामुळे ज्यांनी यापूर्वीच खरेदी केलेल्या १०० व २०० रुपयांचे स्टॅम्पपेपर पुढे चालणार की त्यांना ते रद्द करून पाचशे रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागणार, याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. 


करारासाठीही ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क 
दस्त नोंदणीसाठी यापूर्वी १०० किवा २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज नोंदणीकृत करता येत होते. मात्र, आता ही रक्कम किमान पाचशे रुपये करण्यात आली आहे. कोणताही करार करताना वापरावे लागणारे मुद्रांकही ५०० रुपयांचे असतील.


 

Web Title: Expensive stamps hit the common man; The burden of the schemes on the middle class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.