प्रयोगशील शेतकऱ्याने केळी तर पिकवलीच पण चिप्सचाही व्यवसाय सुरू केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 05:42 PM2021-01-12T17:42:40+5:302021-01-12T17:43:17+5:30
Yawatmal news शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावचे राजेश प्रभाकर सवने असेच एक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांनी मागील तीन वर्षांपासून केळी उत्पादन दरम्यान आलेल्या अनेक अडचणीवर मात करून आपल्या शेतीला ऊभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजेश सवने यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु पहिल्या वर्षी अत्यंत तीव्र उन्हाळा आल्याने त्या वर्षी बाग जळून गेली. तेव्हा त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा फळधारणा झाली आणि तोडणीला आले तेव्हा कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे गगनाला असलेले केळीचे भाव जमीनदोस्त झाले. त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर त्यांनी विचार केला. शेती म्हटल्यानंतर संकटे येणारच हे त्यांना कळून चुकले होते. स्वत: केळीवर आधारित प्रक्रिया करून विकायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वत: विक्री केली. त्या मध्ये जेमतेम पैसे वसूल झाले. परंतु कळून चुकले होते की शेती संकटातून सावरायचे असेल तर नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.
या दृष्टिकोनातून या वर्षी केळी पिकावर विशेष प्रक्रिया करून विक्री करण्याचे ठरविले. आणि आपल्या शेतातच कच्या केळीपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. सदर उत्पादन आधी स्थानिक पातळीवरील लोकांपर्यन्त पोहोचविण्याचे ठरविले. करिता तयार केळी चिप्स अत्यंत माफक दरामध्ये विक्री सुरू केली आहे. या सर्व घडामोडीतून राजेश सवने यांनी अडचणीवर मात केली आहे. शिवाय अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.