शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा सर्वंकष सर्वेक्षणाचा जिल्ह्यात प्रयोग
By admin | Published: February 28, 2015 02:00 AM2015-02-28T02:00:22+5:302015-02-28T02:00:22+5:30
शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते.
रूपेश उत्तरवार यवतमाळ
शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते. ही दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाय सुचविले गेले तर दुर्घटना टळेल. हाच उदात्त हेतु डोळ्यापुढे ठेवुन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. महसूल आणि वनविभागाने तसा अद्यादेश काढला आहे. गाव पातळीवर १ मार्च पासून सर्वेक्षण होणार असून शासन दरबारी उपाय योजना सूचविल्या जाणार आहे.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन दरबारी विविध उपाय सूचविण्यात आले. मात्र त्यानंतरही आत्महत्या थांबल्या नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील अडचणी जाणुन घेण्यासाठी शासन शेतकरी कुटुंबाच्या दारी जाणार आहे.
पहिला प्रयोग यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राबविला जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे उपसचिव प्रकाश सुरवशे यांनी अध्यादेश जारी केला आहे.
कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांचा अर्ज भरून घेणार आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबाकडे किती एकर शेत जमीन आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्य काय काम करतात. त्यांच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय आहे का, त्यातून त्यांना काही उत्पन्न मिळते का, गुरे, शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जणावर किती आहेत. कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे. सावकाराचे कर्ज आहे का, शैक्षणिक कर्ज घेतले आहे का, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविण्यात आला आहे का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणातून शोधली जाणार आहे . त्यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या, याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यातूनच शेतकरी कुटुंबासमोरील अडचणीचा डोंगर दूर करण्यासाठी उपाय सूचविले जाणार आहे. यामुळे हे सर्वेक्षण एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण गवसणार आहे.