कालबाह्य एसटी गाड्यांवर डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:27 PM2019-05-20T21:27:03+5:302019-05-20T21:27:24+5:30
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.
सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून एस.टी.महामंडळाकडे पाहिले जाते. मात्र महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. सुसज्ज व स्वच्छ वातावरण, भरपूर जागा असलेला हा आगार आहे. २०१८ मध्ये या आगाराचे उत्पन्न ८९ लाख ७५ हजार ४६७ एवढे झाले. परंतु यावर्षी २०१९ मध्ये उत्पन्नात घट झाली असून यावर्षीचे उत्पन्न केवळ ७७ लाख ४६ हजार ३३० रुपये ईतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वणी आगाराला १२ लाख २९ हजार १३७ रुपये तोटा सहन करावा लागला आहे.
या आगारामध्ये पाच वर्षांपासून नवीन बसेस आल्याच नाहीत. येथील आगारात निळ्या व लाल रंगाच्या बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १२ बसेस आहेत. ४० लाल रंगाच्या बसेस आहेत. यांपैकी ४५ बसेस सध्या सेवा देत असून सात बसेस पासींगसाठी जिल्हा आगारात पाठविण्यात आल्या आहेत. एक शिवशाही बस वणी येथून नागपूर या मार्गावर धावते. दुसरी शिवशाही बस अकोलासाठी सोडण्यात येत होती. परंतु या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यात आली आहे.
या आगारामधील २५ बसेस आजवर १० ते १२ लाख किलोमिटर धावल्या असून त्यामुळे त्या आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. या आगारामध्ये संपूर्ण परिसरासाठी व लांब पल्ल्यावर पाठविण्यासाठी ५२ बसेसची आवश्यकता आहे. परंतु नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्त करून त्याद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. गेल्या एक वर्षापासून आगार प्रमुखाचे पद रिक्त असून सध्या या आगाराचा कारभार प्रभारावरच सुरू आहे. या आगारावर कुणाचे नियंत्रण नसल्याने सकाळ पाळीतील बसेसही वेळेवर सुटत नाहीत.
प्रवासी वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोट्यवधी रूपये खर्च करून वणीत बसस्थानक उभारण्यात आले. भंगार बसेसमुळे प्रवाशांचा ओढा खासगी बसमधून प्रवास करण्याकडे होत असल्याचे दिसून येत आहे.
वणी आगारात मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत असल्याचे प्रवासी बोलतात. परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी प्रवासी वर्गाचे काही कर्तव्य आहे. त्यांनी आगारासंदर्भातील आपल्या तक्रारी तक्रार पेटीत टाकल्या, तर त्यावर कार्यवाही करता येणार आहे.
- एस.एस.टिपले,
प्रभारी आगार प्रमुख.