अकोलाबाजार-बारड रोडवरील शेतातून स्फोटक साहित्य जप्त
By Admin | Published: February 12, 2017 12:16 AM2017-02-12T00:16:54+5:302017-02-12T00:16:54+5:30
पोलिसांनी अकोलाबाजार ते बारड रोडवरील ग्रामीण रूग्णालयाजवळील एका शेतात लपवून ठेवलेले स्फोटक पदार्थ जप्त केले.
यवतमाळ : पोलिसांनी अकोलाबाजार ते बारड रोडवरील ग्रामीण रूग्णालयाजवळील एका शेतात लपवून ठेवलेले स्फोटक पदार्थ जप्त केले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सदर शेतात स्फोटके दडवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून टोळी विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह शेतात धाड मारली. शेतात आंब्याच्या झाडाजवळ श्वान विरू थबकला. तेथे तपासणी केली असता एका खड्ड्यात तीन बॉक्समध्ये ६०० नग जिलेटीन कांड्या, पोत्यात ७०० नग इलेक्ट्रीक डिटोनेटर आढळले. लगतचच्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात १०२ नग जिलेटीन कांड्या व ६० इलेक्ट्रीक डिटोनेटर आढळले. स्फोटकांसह ट्रॅक्टर जप्त करून स्फोटके विनापरवाना व अवैधरित्या ताब्यात ठेवल्याबद्दल हरफुल गोदू जाट (चौधरी) ३३, रा. जवानपुरा, जि. भिलवरा, राजस्थान (ह.मु.अकोलाबाजार) याला अटक केली. हा साठा ज्ञानेश्वर शेंडे याने मक्त्याने घेतलेल्या शेतात आढळल्याने त्यालाही अटक केल्याचे प,लीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)