शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: January 9, 2016 02:59 AM2016-01-09T02:59:50+5:302016-01-09T02:59:50+5:30
बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
यवतमाळ : बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. हे काम करतानाच कीर्तनकार, प्रवचनकार तथा सामाजिक संस्थांनी विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम राबविणारे कीर्तनकार, प्रवचनकार, कलापथक, कलावंत, सामाजिक संस्था, कवी, साहित्यिक, नाट्यकलावंत, लेखक यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक येथील बचत भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला, विकास माने, संदीप अपार, विधळे, चेतन गिरासे आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियान खऱ्या अर्थाने कीर्तनकार, प्रवचनकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे चांगले वातावरण जिल्ह्यात तयार झाले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांचे कौतुक व केले.
शासनाने स्वस्त दरात गहू व तांदुळ वितरणाची योजना सुरू केली आहे. जीवनदायी आरोग्य योजना, पिककर्ज योजना, जनधन योजना, श्रावणबाळ योजना यासह अनुदानाच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आहते. त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी अभियानांतर्गत जिल्हाभर राबविल्या जात असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली.
कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठिकठिकाणी सादर करावयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)