तूर खरेदीला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:27 PM2018-04-22T22:27:04+5:302018-04-22T22:27:04+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. मात्र आॅनलाईन नोंदणी करूनही अद्याप अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली नाही. गोदामात तूर साठवायला जागा नसल्याने शेकडो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. दुरीकडे नोंदणी केलेले शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाने खरेदी बंद केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडे अद्यापही शेकडो क्विंटल तूर साठवून आहे.
आता घरात साठवलेली तूर विकावी कुठे, असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी तुरीचे दर पाडले आहे. घसरलेल्या दरात तुरीची विक्री केल्यास मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे तूर शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर येत आहे. या हंगामासाठी बियाणे, कीटकनाशके घेण्याची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. यामुळे सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काँग्रेसतर्फे निवेदन
तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तालुका काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, सिद्धार्थ गडपायले, मनमोहनसिंग चव्हाण, विजय गोकुळे, विजय वानखडे, रघुनाथ जाधव, गुलाबराव चव्हाण, उत्तमराव गोमासे, राजेंद्र चवात, अशोक देशमुख, रामहरी गावंडे, रकमत खाँ पठाण, वसंतराव सवाई, हरसिंग चव्हाण, शालीग्राम मुधाने, भाऊ कटके, छोटू देशमुख, सुनील मेश्राम, भाऊ जयस्वाल यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.