अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वनरक्षक-वनपाल संघटनेचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 09:45 PM2018-01-11T21:45:33+5:302018-01-11T21:46:00+5:30
जिल्हा दौºयावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा दौऱ्यावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यवतमाळ वनवृत्ताचे पालक सचिव तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे गुरूवारी यवतमाळात आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. मंडे यांनी २२ डिसेंबर रोजी वनपाल व वनरक्षक संघटनेच्या संदर्भात एक परिपत्रक काढले. त्यात संघटनेच्या निवेदनाची, अभिवेदनाची, पत्रव्यवहाराची दखल घेऊ नये, असे निर्देश दिले. वनसंहितेत दर्शविलेल्या सूचनेप्रमाणेच वनरक्षक, वनपाल यांनी आपले कर्तव्य बजावावे, असे आदेशीत केले. या परिपत्रकामुळे वनरक्षक व वनपालांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. वनसंहितेचा आधार घेऊन सरळ अधिकृत संघटनांचे अस्तित्वच नाकारण्यात आले. याविरूद्ध महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेने उग्र भूमिका घेतली.
गुरुवारी वन कार्यालयात बैठक सुरू असताना संघटनेचा मोर्चा धडकला. परिपत्रक रद्द करावे, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. अखेर एपीसीसीएफ यांनी चर्चेची तयारी दर्शविली. त्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हिरानंद मिश्रा, कोषाध्यक्ष शेखर साठे, डी.पी. चव्हाण, अमित मोर, सुनील पवार, गहरवाल आदींचा समावेश होता.