उईकेंच्या विजयात पुरकेंचा वाटा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:24 PM2018-12-12T22:24:53+5:302018-12-12T22:25:13+5:30
येथील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी उईकेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उईके निवडून यावे म्हणून कार्यकर्त्यांसह प्रचंड परिश्रम घेतले. अखेर उईके निवडून आले आणि पुरकेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
के.एस. वर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी उईकेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उईके निवडून यावे म्हणून कार्यकर्त्यांसह प्रचंड परिश्रम घेतले. अखेर उईके निवडून आले आणि पुरकेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी नुकतीच निवडणूक होऊन मंगळवारी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसने छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा विधानसभा मतदारसंघातून नीलेश पुसाराम उईके यांना उमेदवारी दिली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. काँग्रेस उमेदवार उईके यांच्या प्रचारासाठी पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानुसार प्रा.पुरके यांनी पांढुर्णा मतदारसंघात तळ ठोकला होता. उईके यांच्या प्रचारासाठी प्रा.पुरके यांनी जीवाचे रान केले. अनेक प्रचारसभा घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. प्रचार नियोजनासाठीही मार्गदर्शन केले. दिवसा सतत धावपळ करून घाम गाळला.
मंगळवारी मतमोजणीअंती काँग्रेसचे उमेदवार नीलेश उईके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. अखेरच्या क्षणापर्यंत या मतदारसंघात उत्कंठा होती. अनेकदा कधी भाजप उमेदवार आघाडीवर राहात होते, तर कधी उईके आघाडीवर जात होते. मात्र अखेर उईके यांनी बाजी मारली. त्यामुळे माजी मंत्री प्रा.पुरके यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे स्पष्ट झाले. उईकेंच्या या विजयाची राळेगावात चर्चा आहे.