शासकीय भूखंडावर भू-माफियांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:46 AM2021-09-06T04:46:17+5:302021-09-06T04:46:17+5:30
फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर भू-माफियांचा डोळा आहे. ही जागा परस्पर विक्री करण्याचा घाट ...
फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर भू-माफियांचा डोळा आहे. ही जागा परस्पर विक्री करण्याचा घाट रचला जात आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय गुरांचा दवाखाना, आठवडी बाजार व शासकीय गोदाम आदी शासकीय कार्यालयांसाठी जागा घेण्यात आली. १ जानेवारी १९१८ रोजी डिस्ट्रिक्ट बोर्ड यवतमाळने (जिल्हा परिषद) शेत सर्व्हे नंबर ६१ चे मालक ताजोद्दीन व अयाजोद्दीन नवाब या दोन भावंडांकडून ५ हेक्टर ५९ आर एवढी जमीन विकत घेतली. त्यामुळे या शेत सर्व्हे नंबरचे विभाजन होऊन शेत सर्व्हे नंबर ६१/१ व शेत सर्व्हे नंबर ६१/२ असे झाले होते.
शेत सर्व्हे नंबर ६१/१ ही आता शासकीय जागा आहे; मात्र त्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले आहे. या ५ हेक्टर ५९ आर, जागेवर सध्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, प्राथमिक मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, गुरांचा दवाखाना, शासकीय गोदाम, आठवडी बाजार व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर मैदान आहे, परंतु जागेचे महत्त्व वाढत असल्याने काही भूमाफियांनी डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करुन पक्के बांधकाम करुन ताबा केला आहे. काहींनी केलेले बांधकाम भाड्याने दिले. काही बहाद्दरांनी चक्क मुद्रांकावर जागेची विक्री चिठ्ठी करून शासनाची मालमत्ता विकून टाकल्याची माहिती आहे.
याच शेत सर्व्हे नंबर ६१ पैकी ६१/२ च्या मालकाने त्यांच्या जागेची मोजणी केली. त्या संपूर्ण जागेला पुसदचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी विनय गोस्वामी यांच्या आदेशानुसार २०१०-२०११ मध्ये अकृषक दाखविले. त्यावर ७३ प्लाॅटचे ले-आऊट पाडले. त्यामुळे आता त्याची कोणतीही जागा शिल्लक नसतानाही याच परिसरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने डिस्ट्रिक्ट बोर्डाची जागा त्यावर त्यांचा डोळा आहे. यासाठी त्यांनी शासकीय ‘वजन’ वापरुन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मैदानावर मुरुम टाकून ही आमची जागा असल्याचा दावा केला आहे. आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून डिस्ट्रिक्ट बोर्डाची जागा मोजमाप करुन जागेची हद्द कायम करण्याची मागणी होत आहे. तसेच अतिक्रमण काढण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोट
जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या जागेवर होणारे अतिक्रमण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित काढून भू-माफियांकडून शासकीय भूखंडावरील ताबा करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडावे. अन्यथा गावकरी व आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.
विजयराव महाजन, माजी सभापती, पंचायत समिती, महागाव
कोट
डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या मालकीच्या जागेवर भू-माफियांकडून ताबा करण्यात येत आहे. जागा अवैधरित्या विकली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित जागेची भूमी अभिलेखकडून मोजणी करुन शासकीय जागेचे पक्के सीमांकन करुन घ्यावे.
नसीर खान बशीर खान, माजी उपसरपंच, फुलसावंगी