तस्करांचा ‘पैनगंगा’वर डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:51 PM2018-06-12T21:51:44+5:302018-06-12T21:51:44+5:30
केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे. गंभीर बाब ही की, वणी शहरालगतच्या लालपुलिया परिसरातील काही कोलडेपोंवर या चोरीतील कोळशाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती असून या कोलडेपो चालकांचे तस्करांशी साटेलोटे असल्याचे सांगितले जाते. या व्यवहारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.
मागील १५ दिवसांपूर्वी पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीतून कोळसा चोरल्यानंतर त्याची विल्हेवाट वणीतील एका कोलडेपोवर लावण्यात आली होती. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. एम.एच.४०-बी.जी ६६३६ या क्रमांकाच्या ट्रकमधून पैनगंगा कोळसा खाणीतून ३० टन कोळसा चोरून आणून तो वणीतील एका कोळसा डेपोवर उतरविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गडचांदूर पोलिसांचे एक पथक मध्यंतरी वणीत येऊन गेले. मात्र या विषयात अद्याप कुणालाही अटक झाली नाही. यासंदर्भात गडचांदूरचे ठाणेदार महेश कोंडावार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या रमजानचा सण असल्याने आम्ही बंदोबस्तात व्यस्त आहोत. बंदोबस्त संपला की लगेच हे प्रकरण हाती घेऊ असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वणी परिसरातील १२ खाणींपैैकी मुंगोली, निलजई, उकणी, जुनाड या खाणी सुरू आहेत. अन्य खाणी मात्र बंद अवस्थेत आहेत. मात्र तरीही कोळशाची तस्करी सुरू आहे. मात्र तस्करांची संख्या मोठी असल्याने राजकीय आश्रय असलेल्या तस्करांचे या खाणींमध्ये फावत आहे. ज्यांना राजकीय आश्रय नाही, ते तस्कर पैैनगंगा परियोजनेतून कोळसा लंपास करीत असल्याची माहिती आहे.
हा चोरीचा कोळसा वणीतील काही विशिष्ट कोलडेपोवर ‘लोड’ केला जात असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. यासाठी एका मध्यस्ताची नेमणूक केली असून तस्कर आणि कोलडेपो चालक यांच्याातील सेतूचे काम हा मध्यस्त करीत असल्याचे सांगण्यात येते. त्याला कमिशनपोटी मोठी रक्कमही दिली जात आहे. मध्यरात्रीनंतर हा हेराफेरीचा कारभार सुरू केला जातो.
भंगार चोरी सुरूच; वेकोलिकडून मात्र तक्रारीच नाही
कोळसा खाणीतील भंगार चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. लाखो रुपयांचे भंगार बंद असलेल्या खाणीतून पळविले जात आहे. या पार्श्वभूमीवर वणी परिसरात भंगाराच्या दुकानातही वाढ झाली आहे. अनेकदा चोरी होऊनही वेकोलिकडून तक्रार करण्यास टाळाटाळ केली जाते.