आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:58 AM2017-11-26T01:58:44+5:302017-11-26T01:59:50+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
जिल्हा अंधत्व निवारण समिती, रोटरी क्लब आणि डायाभाई मजिठीया आयुर्वेद रुग्णालयातर्फे संयुक्तपणे हे शिबिर घेण्यात आले. शुक्रवारी जवळपास २५ रुग्णांवर मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शनिवारी राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा लोकमतचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी नेर, वाघापूर आदी ठिकाणाहून आलेल्या रुग्णाशी हितगुज केले.नंतर बोलताना त्यांनी रुग्णसेवा ही ईश्वरी सेवा असल्याचे सांगितले. सामाजिक उपक्रमात दर्डा परिवार नेहमी सहभागी होत असून यापुढेही अशा उपक्रमाना नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी डॉ.सुरेंद्र पद्मावार यांनी रुग्णालयाशी दर्डा परिवाराचे अत्यंत जवळचे संबंध असून अशा उपक्रमाना त्यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढील उपक्रमाना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष माधवी राजे, मिलींद राजे, दिलीप राखे, राजश्री धर्माधिकारी, डॉ. आशिष गौरशेट्टीवार, अनंत पांडे, मंगेश खुने, डॉ. राजेश चव्हाण आदी उपस्थित होते. शेवटी राजेंद्र दर्डा, किशोर दर्डा यांच्या हस्ते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्मा व औषधांचे वाटप करण्यात आले.