जनावरांची तस्करी रोखण्यात अपयश

By admin | Published: July 25, 2016 12:45 AM2016-07-25T00:45:44+5:302016-07-25T00:45:44+5:30

येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे

Failure to prevent smuggling of animals | जनावरांची तस्करी रोखण्यात अपयश

जनावरांची तस्करी रोखण्यात अपयश

Next

नागपूरकडून येतात वाहने :  तीन महिन्यांत सहा ट्रक पकडले
नरेश मानकर पांढरकवडा
येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे.
महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे जनावरे नेल्या जात आहेत. गोहत्या व गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर गोवंश तस्करी बंद होण्याऐवजी वाढतच आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यावर ही तस्करी रोखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यातीलच काही मंडळीची या तस्करीला मुकसंमती असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे. पिंपळखुटी चेकपोस्टवरील एका प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर या प्रकरणात कारवाईसुद्धा करण्यात आली.
गेल्या तीन महिन्यात आत्तापर्यंत हैैद्राबादच्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे जवळपास सहा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टवर पकडले. शेकडो जनावरांना जीवदान दिले. तरीदेखील जनावरांची तस्करी सुरूच असून नियमितपणे ट्रकव्दारे हैदाबादच्या कत्तलखान्याकडे जनावरे नेली जात आहे. गेल्या १८ जुलै रोजी हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पिंपळखुटी चेकपोस्टजवळ पकडला. या ३० जनावरांपैकी १२ जनावरांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा २२ जुलै रोजी हैद्राबादकडे नऊ जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. आता पुन्हा शनिवारी कोपामांडवीजवळ कत्तलखान्यात पायदळ नेण्यात येत असलेली १४ जनावरे पकडली असून ही जनावरे गोरक्षण मंडळाच्या सुपुर्द करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले.
जनावरांच्या तस्करीला आळा न बसता जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. त्यामुळे पशूधनच संकटात सापडले आहे. प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसले असून या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी विविध संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी येथे चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले. गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येतात. गोवंशाची तस्करी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यासाठी पोलीस व आर.टी.ओ. विभाग जबाबदार असल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे.
विशेष म्हणजे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर ट्रकव्दारे जनावरांची तस्करी होत असतांना हे ट्रक मधात कुठेच अडविल्या जात नाही. पोलीस आणि आर.टी.ओ.विभाग काही मोजक्याच ट्रकवर कारवाई करतात.
गोवंशाची हत्या व वाहतूक रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना व परिवहन विभागालासुद्धा आदेश दिले असतांना जनावरे भरलेली वाहने नागपूर शहरातून निघून तेलंगणाच्या सिमेपर्यंत येतातच कशी, हा संशोधनाचा विषय आहे. मध्यप्रदेशातून नागपूरमार्गे जनावरे भरून येणारे ट्रक बिनधास्तपणे तेलंगणात कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याने पोलिसांनी महामार्गावर तपासणी मोहिम राबविली असून अशी वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तरीही पोलिसांची नजर चुकवून अनेक ट्रक तेलंगणातील कत्तलखान्यात जात आहे.

प्रशासन चिरीमिरीत मश्गुल, जनावरांचा जातोय जीव
गोहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण आल्यास सामाजिकसंघटना, लोकप्रतिनिधींची मदत प्रशासनाने घ्यावयास पाहिजे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे जनावरे खरेदी करणाऱ्यांची आणि त्यांच्या दलालांची हिम्मत वाढली आहे. ही जनावरे खरेदी करून तेलंगणात नेणाऱ्या तस्करांच्या असभ्य व दहशतवादी कारवायांमुळे सामान्य नागरिक घाबरत आहे. प्रशासनातील मंडळी मात्र चिरीमिरीच्या लोभात गंभीरपणे लक्ष घालून कठोर कारवाई करण्यास तयार नाही. याबाबत येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली होती. तथापी प्रशासनाने अद्याप पाहिजे तशी कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रीय महामार्गाने हैद्राबादला कत्तलखान्यात जाणारी जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

 

Web Title: Failure to prevent smuggling of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.