मंदिर संस्थान ताब्यात घेण्यासाठी बनावट विश्वस्त मंडळ; सहा जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 06:55 PM2023-04-25T18:55:35+5:302023-04-25T18:55:48+5:30
मंदिर संस्थानचा कारभार ताब्यात घेण्यासाठी येथील काहीजणांनी चक्क बनावट कागदपत्रांद्वारे बनावट विश्वस्त मंडळ निर्माण केले.
हरीओम बघेल
आर्णी (यवतमाळ) : मंदिर संस्थानचा कारभार ताब्यात घेण्यासाठी येथील काहीजणांनी चक्क बनावट कागदपत्रांद्वारे बनावट विश्वस्त मंडळ निर्माण केले. या प्रकाराची तक्रार होताच पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे. शहरातील गांधीनगर परिसरातील हनुमान मंदिर संस्थानबाबत हा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
आत्माराम राजाराम जाधव (४५), गजानन महादेव काळे (४२), गणेश किशन मस्के (५०), प्रकाश पुंजाजी पेंदोर (५५), विक्की अशोक बोरचाटे (२४), दिलीप बंडू गेडाम (३०, सर्व रा. गांधीनगर, आर्णी) अशी बनावट विश्वस्त मंडळ तयार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गांधीनगर परिसरात हनुमान मंदिर आहे. त्या मंदिराचे जुनेच विश्वस्त आहेत. असे असताना आत्माराम जाधव व इतर लोकांनी या मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ तयार करून संस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून बनावट विश्वस्त मंडळ तयार केले. याविरुद्ध जितेंद्र मोतीराम बनगीनवार (५३, रा. गांधीनगर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच आर्णी न्यायालयात आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली. त्यावरून न्यायालयाने आर्णी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. यावरून पोलिसांनी भादंवि कलम ४१८, ४२०, ४६८, ४६९, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. तसेच या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन अजमिरे, जमादार योगेश सुंकलवार, ऋषिकेश इंगळे, नफीस शेख यांनी केली.