तोतया पोलिसांनी युवकाला लुटले, राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामाता गावची घटना
By विलास गावंडे | Published: April 24, 2023 05:38 PM2023-04-24T17:38:36+5:302023-04-24T17:39:06+5:30
दोघांना केली अटक
वडकी (यवतमाळ) : पोलिस असल्याची बतावणी करून युवकाला लुटणाऱ्या दोघांना वडकी पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली. करंजी सोनामाता (ता.राळेगाव) येथे २२ एप्रिलच्या रात्री १०:३०च्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील एक जण करंजी सोनामाता येथील, तर दुसरा हिंगणघाट (जि. वर्धा) येथील रहिवासी आहे.
करंजी सोनामाता येथील विकास विठ्ठल कोडापे (२५) हे घरासमोर बंडीवर झोपून होते. त्यावेळी दोन जण त्यांच्याजवळ आले. आपण पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळ असलेले तीन हजार ५०० रुपये घेऊन पसार झाले. या प्रकाराची तक्रार विकास कोडापे यांनी २३ एप्रिल रोजी वडकी पोलिसात दिली. ठाणेदार विजय महाले यांनी लगेच या प्रकाराचा तपास सुरू केला. चोरट्याचे वर्णन, वापरलेले साहित्य व वाहन आदी माहिती तक्रारदाराकडून घेतली.
या आधारे तपासाचे चक्र वेगाने फिरविण्यात आली.
ठाणेदार हे पथकासह लुटारुंच्या शोधात वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. आरोपींना पकडण्यात त्यांना यश आले. महेंद्र रमेश अंबुलकर (४५) रा.शास्त्री वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा याला हिंगणघाट येथून, तर दीपक पंढरी मेश्राम (४०) रा. करंजी सोनामाता याला वडनेर येथून अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून एक चारचाकी, दोन दुचाकी, दोन प्लास्टिक काठ्या व लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली. लुटारुंमध्ये आणखी एकाचा सहभाग असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय महाले, पोलिस उपनिरीक्षक विजय चलाख, विनोद नागरगोजे, विलास जाधव, विक्की धावर्तीवार, सचिन नेहारे यांनी ही कारवाई पार पाडली.
दुसऱ्या गुन्ह्यातही सहभाग
करंजी सोनामाता येथील घटनेचा तपास करतानाच पोलिसांना यवतमाळ येथील व्यक्तीला लुटल्याच्या घटनेचाही तपास लागला. अटकेतील आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस असल्याची बतावणी करून यवतमाळ येथील सुमेद लक्ष्मण लोखंडे यांनाही लुटल्याची नोंद पोलिस दप्तरी होती. या घटनेत आणखी दोघांचा समावेश असल्याची माहिती आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.