खाद्य तेलाच्या फॉर्च्यून ब्रॅन्डची बनावट विक्री
By सुरेंद्र राऊत | Published: July 29, 2024 06:26 PM2024-07-29T18:26:31+5:302024-07-29T18:27:14+5:30
यवतमाळचे कनेक्शन नागपूरशी : नागपूरमध्ये उघड झाला होता बनावट ब्रॅन्डचा खाद्य तेल कारखाना
यवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेसह किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये झाडाझडती घेऊन फॉर्च्यून ब्रॅन्ड असलेल्या कंपनीच्या पथकाने बनावट खाद्य तेल विक्री होत असल्याचा प्रकार उघड केला. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करून विक्री करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. फॉर्च्यून ब्रॅन्डचा बनावट डबा तयार करून तेल विक्री केल्याचा प्रकार नागपूरमध्ये मे महिन्यात उघड झाला. असा कारखानाच हाती लागला होता. त्यामुळे यवतमाळचे कनेक्शन नागपूरशी असल्याचा दाट संशय आहे.
फॉर्च्यून कंपनीचे निरीक्षक अनुप कोलप यांनी १४ मे रोजी लकडगंज पोलिस ठाणे नागपूर येथे तक्रार दिली होती. त्यावरून वासुदेव खंडवाणी, मोरेश्वर घुमडे, अतुल रायचुरा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्याचा तपास करताना यवतमाळातील लिंक हाती लागली.
त्यानंतर फॉर्च्यून कंपनीचे निरीक्षक अनुप कोलप व त्यांचे सहकारी यवतमाळातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या तेलावर लक्ष ठेऊन होते. कंपनीच्या अधिकृत डिलरकडून फॉर्च्यून ब्रॅन्डच्या सोयाबीन, सूर्यफूल, फल्ली या तेलांची मागणी आणि बाजारात होत असलेली विक्री यात बऱ्याचअंशी तफावत आढळून आली. फॉर्च्यून ब्रॅन्डच्या नावाने बनावट डबे तयार करून विक्री होत असल्याचा प्रकार लक्षात आला. या संपूर्ण प्रकाराची गोपनीय माहिती घेऊन नंतर फॉर्च्यून ब्रॅन्डच्या निरीक्षक पथकाने पोलिस अधीक्षकांपुढे ही धक्कादायक माहिती सांगितली. त्यावरून शनिवारी यवतमाळ शहरात धाडसत्र राबविण्यात आले. यात मोठा बनावट तेलसाठा हाती लागला. या प्रकरणी चौघांवर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे व त्यांचे पथक करीत आहे.
नऊ महिन्यापूर्वीच बनावट खाद्य तेल विक्रीची दिली होती सूचना
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात फॉर्च्यून ब्रॅन्डच्या नावाने बनावट खाद्य तेलाची विक्री होत असल्याचा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये निर्देशनास आला होता. अन्न सुरक्षा व निरीक्षण अधिकाऱ्याने याबाबतची सूचना फॉर्च्यून कंपनीतील एका अधिकाऱ्याला दिली होती. अन्न सुरक्षा व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून खाद्य तेलाची पडताळणी साधारणत:च्या काळात केली जाते. यामध्ये नमुने घेतले असता ब्रॅन्डच्या नावे बनावट तेल विक्री होत असल्याचा संशय आला. मात्र याची दखल फॉर्च्यून कंपनीच्या प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रॅन्डचा वापर करून बनावट खाद्य तेल विक्री करणारे रॅकेट मोकाट होते.
अन्न सुरक्षा विभागही करणार पडताळणी
ब्रॅन्डच्या नावाने बनावट खाद्य तेल विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. याची दखल अन्न सुरक्षा विभागानेही घेतली असून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी खाद्य तेल विक्रीच्या विविध ब्रॅन्डचे नमुने घेतले जाणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनी खाद्य तेल घेताना अधिकृत घाऊक वितरकाकडूनच तेल खरेदी करावे, सोबत पक्के बिल घ्यावे अन्यथा अशाही प्रकरणात कारवाई केली जाईल, असे सहायक अन्न सुरक्षा आयुक्त गोपाल माहोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.