शेतशिवारातील मजुरांचे तुंगे हद्दपार
By admin | Published: July 27, 2016 12:33 AM2016-07-27T00:33:03+5:302016-07-27T00:33:03+5:30
पिकांमध्ये वाढलेले तणनियंत्रण शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या असून आतापर्यंत मजुरांच्या हाताने निंदण करून तणांचे नियंत्रण केले जात होते.
तणनाशकांचा वाढता वापर : मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावला, दोन पाळीत चालत होते काम
पांडुरंग भोयर सोनखास
पिकांमध्ये वाढलेले तणनियंत्रण शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या असून आतापर्यंत मजुरांच्या हाताने निंदण करून तणांचे नियंत्रण केले जात होते. गावागावात मजुरांचे तुंगे दिसत होते. यातून शेतातील तणनियंत्रण वेगाने होत होते. मजुरांना हक्काची रोजी मिळत होती. परंतु अलिकडे तणनाशकांचा वापर वाढला असून मजुराऐवजी ‘स्प्रे’ करून तणनियंत्रण केले जाते. यात मात्र मजुरांच्या हक्काचा रोजगार हिरावल्याचे गावागावात दिसते.
खरीप हंगामात पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी गत तीन-चार वर्षापर्यंत मजूर शेतात राबत होते. विळ्याच्या मदतीने मजूर निंदण करायचे. यातून मजुरांना चांगला रोजगार मिळायचा. घरातील सर्व मंडळी मजुरीवर जायची. कालांतराने यात तुंगा पद्धत आली. गावातील १५ ते २० मजूर एकत्र करून त्यांचा प्रमुख शेतकऱ्यांकडून ठेका घेत होता. यातून मजुरांना चांगली मजुरी मिळत होती. काही भागात तर दोन पाळीत निंदण चालायचे. सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ११ ते ५ या वेळात निंदण केले जायचे. यातून एका आठवड्याला ७०० ते ८०० रुपये मजुरी एका मजुराला मिळत होती. या तुंग्याच्या प्रमुखाला ग्रामीण भागात मेटकर असे म्हणतात. हा मेटकर या संपूर्ण मजुरांवर नियंत्रण ठेवून शेतात काम करतो. त्यासाठी त्याला प्रत्येक मजुरामागे शेतमालक १० रुपये देत होता. यामुळे शेतात शेतमालकाला जाण्याचीही गरज नव्हती. शेतातील निंदणही व्यवस्थित होत होते. त्यामुळे गावागावात तुंग्यांचे पीक फोफावले होते. काही तुंग्यात तर १०० पर्यंत मजूर दिसत होते. एका दिवसात १० एकराचे शेत निंदून काढण्याची क्षमता या तुंग्यांमध्ये होती. त्यामुळे गावातच नाही तर परगावातही तुंग्याने मागणी यायची. ट्रॅक्टरद्वारे मजुरांना शेतापर्यंत नेले जायचे. मात्र आता तुंगा हद्दपार होण्याच्या मार्गावर आला आहे. त्याचे कारण म्हणजे तणनाशकांचा वाढता वापर होय.
अलिकडे मजूर मिळणे कठीण झाले, अशी हाकाळी शेतकरी ठोकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निंदणाऐवजी थेट तणनाशक वापरण्याचा फंडा सुरू केला आहे. शेतातील पिकांच्या तासामध्ये तणनाशक फवारले जात आहे. त्यामुळे तणाचे नियंत्रण होते. परंतु या तणनाशकातील विषारी रसायनाचा दीर्घकालीन परिणाम जमिनीवर होतो. परंतु अगदी कमी पैशात तणनियंत्रण होत असल्याने शेतकरी सध्या तणनाशकाकडे वळले आहे. त्यातच विविध तणनाशक कंपन्या शेतकऱ्यांना जाहिरातीच्या माध्यमातून भुरळ घालत आहे. परिणामी मजुरांच्या हक्काचा रोजगार हिरावला असून अनेकजण आता मिळेल ते काम करण्याच्या मानसिकतेत आहे.
असा असायचा तुंगा
नेर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी तुंगा पाहायला मिळतो. परंतु पाच वर्षापूर्वी गावागावात तुंग्याचे पीक आले होते. तुंग्याचा प्रमुख मेटकर गावातील मजुरांना एकत्र करायचा. त्यांच्यावतीने शेतमालकाकडून निंदणाचा ठेका घ्यायचा. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी मजुरांना मजुरी दिली जायची. शेतकरी आणि मजूर यांच्यातील दुवा म्हणून मेटकर काम करायचा. गावातील मजुरांना एक प्रकारे जगविण्याचे कामच या मेटकराच्या माध्यमातून होत होते. आता तुंगाही हद्दपार झाला अन् मेटकरही.