पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By admin | Published: May 2, 2017 12:05 AM2017-05-02T00:05:26+5:302017-05-02T00:05:26+5:30
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे.
महाराष्ट्र दिन : शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे. या योजना राबवितानाच शेतकऱ्यांना सक्षमपणे पुढे नेण्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनानिमित्त येथील पोस्टल मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सेवा हमी कायदा आणल्याने कालमर्यादेत कामे होवू लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुपटीने वाढले. यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ३०२ कोटीची योजना मंजूर झाली. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १४५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल. धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या आहेत. वीज जोडण्यासाठी १५५ कोटी उपलब्ध होत आहे. फिडर विलगीकरणासाठीही ७५ कोटींचा प्रस्ताव आहे. मार्च २०१८ पर्यंत मागेल त्याला २४ तासात वीज कनेक्शन दिले जातील. यवतमाळात अंडरग्राऊंड वीज वाहिनीचे काम सुरु झाले असून पुसद, वणी, पांढरकवडा, उमरखेड येथेही असे प्रस्ताव तयार केल्या जात आहे. राज्यात सौर उर्जेचे तीन प्रकल्प उभारले जात असून, त्यातील एक प्रकल्प अकोलाबाजारजवळ मांजर्डा येथे उभा राहत आहे. रेल्वे मार्गाचे भूसंपादन गतीने सुरू आहे. थेट खरेदीने चार पटीपेक्षा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ना.येरावार म्हणाले. शेतकऱ्यांना शेतीत विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचीही माहिती त्यांनी दिली.
तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. खरेदीसाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. खरेदीच्या नावावर व्यापार होवू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी टिपेश्वर, पैनगंगा, सहस्त्रकुंड, चिंतामणी देवस्थान कळंब, संकटमोचन ही स्थळे विकसित होत असून यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे ना. मदन येरावार यांनी यावेळी सांगितले.
ध्वजारोहनानंतर पोलीस व विविध दलाच्यावतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (वार्ताहर)