शहीदाच्या कुटुंबाने जोपासली देशप्रेमाची ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:16+5:30
केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांच्या अडचणी वाढल्या. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबातील कर्ता मुलगा शहीद झाला. तो शहीद झाल्यानंतरही त्याच्या कुटुंबाने देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. याच ज्योतीतून कोरोनाच्या संकटसमयी शहीदाच्या कुटुंबाने गावातील गरजवंतांना मदतीचा हात दिला.
केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांच्या अडचणी वाढल्या. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही स्थिती लक्षात घेऊन आडे परिवाराने केळझरा आणि कृष्णनगर येथे शेतकरी, शेतमजूर, गरजवंतांना मदतीचा हात दिला.
शहीद ज्ञानेश्वर आडे परिवाराचे प्रमुख तथा कृषी ऊत्पन बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, त्यांच्या पत्नी केळझराच्या सरपंच कुंतीबाई आडे यांनी गावातील गरजवंतांना आधार देण्यासाठी जे गरजेच आहे, ते देण्याचे ठरविले. यानंतर प्रति कुटुंब पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो साखर, चहापत्ती, मिठ पुडा, तूर डाळ, तेल, कांदे आदी मिळून प्रति कुटुंब एक कीट तयार केली. अशा किट गरजवंतांना देण्यात आल्या.
यात कृष्णनगर येथील ३५२, तर केळझरा येथील ४५ कुटुंबांना मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, नुनेश्वर आडे, कुंतीबाई आडे, बाजार समितीचे सचिव के.डी. वारकड, इंदल महाराज आदी उप्स्थित होते.
गावकऱ्यांनी व्यक्त केला अभिमान
अत्यंत अडचणीच्या काळात शहीदाच्या कुटुंबांने मदत दिल्याने गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला. मुलगा शहीद झाल्यानंतरही आडे कुटुंबाने या उपक्रमातून देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आपल्या गावात शहीद ज्ञानेश्वर आडे जन्माला आल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी अडचणीच्या काळात देशवासीयांच्या मदतीसाठी धाव घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.