शेतकरी आलेच नाही, शेवटी रिकाम्या खुर्च्या हटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:30 PM2019-03-02T23:30:57+5:302019-03-02T23:32:09+5:30
कृषी महोत्सवाच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांची गर्दी आहे. हे दाखविण्यासाठी आयोजकांनी शनिवारी अर्ध्या भागातील खुर्च्याच उचलून ठेवल्या. ‘त्या’ संपूर्ण भागाला पडदा बांधला. यामुळे निम्म्या भागात गर्दी दिसली. मात्र यामध्ये अर्ध्या खुर्च्या महिलांसाठीच राखीव होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी महोत्सवाच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांची गर्दी आहे. हे दाखविण्यासाठी आयोजकांनी शनिवारी अर्ध्या भागातील खुर्च्याच उचलून ठेवल्या. ‘त्या’ संपूर्ण भागाला पडदा बांधला. यामुळे निम्म्या भागात गर्दी दिसली. मात्र यामध्ये अर्ध्या खुर्च्या महिलांसाठीच राखीव होत्या. दुपारनंतर ही गर्दीही ओसरली.
आत्मा प्रकल्प आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित कृषी महोत्सवाला चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी जमविता आली नाही. यामुळे शनिवारी आयोजकांनी चर्चासत्राच्या स्थळी नवा प्रयोग राबविला. चर्चासत्राच्या डोममध्ये अर्ध्या भागातील खुर्च्या हटविण्यात आल्या. खुर्च्या हटविलेल्या भागामध्ये पडदा लावण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये काही वेळ गर्दी दिसू शकली. पण दुपारनंतर तीही ओसरली.
शेतकऱ्याने केली प्रशासनाची पोलखोल
चर्चासत्राकरिता आलेल्या एका शेतकऱ्याने आयोजकाला व्यासपीठावरून बोलू देण्याची विनंती केली. आयोजकांनी ती विनंती मान्य केली. माईक हातात पडताच शेतकऱ्याने गुलाबी बोंडअळीवर मार्गदर्शनच मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. कृषी क्षेत्रातील मार्गदर्शन अपुरे पडत असल्याचे मत नोंदवित आयोजकांना खडेबोल सुनावले. यानंतर या शेतकऱ्याने सर्व स्टॉलवर भेटी देऊन स्टॉलधारकांचा अभ्यास किती आहे, याची माहिती घेत प्रश्न विचारले.
चौथ्या दिवशी प्रसाधनगृह आले
कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालय, मुतारी याची व्यवस्था नव्हती. यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची कुचंबणा होत होती. या उणीवांची दखल घेत आयोजकांनी चौथ्या दिवशी मोबाईल प्रसाधनगृहाची व्यवस्था केली.