अखेर तेच घडले... तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा बळी गेला
By विलास गावंडे | Published: June 26, 2023 04:45 PM2023-06-26T16:45:36+5:302023-06-26T16:47:11+5:30
आपल्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारल्याची माहिती चार दिवसाआधी विठ्ठल कुळसंगे यांनी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. कर्मचाऱ्याने पाहू, करू, अशी उत्तरे दिली.
राळेगाव (यवतमाळ) : साहेब, माझ्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारला आहे. तातडीने दुरुस्त करा, नाही तर एखाद्याचा बळी जाईल, अशी सूचना वारंवार करण्यात आली. कंपनीने दुर्लक्ष केले. अखेर तेच घडले. तक्रारकर्त्या शेतकऱ्याचाच विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास टाकळी (ता.राळेगाव) येथे घडली. विठ्ठल संभाजी कुळसंगे (७५), असे मृताचे नाव आहे.
आपल्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारल्याची माहिती चार दिवसाआधी विठ्ठल कुळसंगे यांनी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. कर्मचाऱ्याने पाहू, करू, अशी उत्तरे दिली. आज ते शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम करीत होते. पावसामुळे सर्वत्र पाण्याचा ओलावा होता. खांबापासून काही अंतरावर काम करीत असताना विजेचा धक्का बसून ते फेकल्या गेले. त्यांना तातडीने वडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी विद्युत कंपनीच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात होता.