शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी
By admin | Published: August 25, 2016 01:49 AM2016-08-25T01:49:28+5:302016-08-25T01:49:28+5:30
कर्जबाजारीपणा आणि आजाराने त्रस्त होवून आत्महत्या केलेल्या शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी
समाजमन गहिवरले : शेलू येथे गळफास लावून संपविली जीवनयात्रा
आर्णी : कर्जबाजारीपणा आणि आजाराने त्रस्त होवून आत्महत्या केलेल्या शेतकरी पिता-पुत्राला एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आली. आर्णी तालुक्यातील शेलू सेंदूरसणी येथे बुधवारी या पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण गहिवरला होता.
काशीराम चंद्रभान मुधळकर आणि त्यांचा मुलगा अनिल काशीराम मुधळकर या दोघांनी एकाच झाडाला दोर बांधून मंगळवारी दुपारी आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. बुधवारी दुपारी शेलू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर पिता-पुत्राचे प्रेत ठेवले तेव्हा अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
काशीरामने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा सुनील नावाचा मुलगा बारावी तर दीपक सातवीत शिकत आहे. मुलगी सुनीता ही नवव्या वर्गात शिकत आहे तर अनिता सहाव्या वर्गात आणि प्रांजली दुसऱ्या वर्गात आहे. पित्याच्या मृत्यूनंतर आपल्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा खर्च कोण करणार, असे म्हणत हा परिवार घायमोकलून रडत आहे. काशीरामने गतवर्षीच घर बांधले होते. मात्र पैशाअभावी घराला खिडक्या-दरवाजे लावणे झालेच नाही. त्यातच शेतीही पिकली नाही. यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे गावातील शेतकरी उमेश राठोड याने सांगितले. तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब असून शेतकऱ्याने असा विचार करायला नको, असे माजी जिल्हा परिषद सदस्य अनंता गावंडे यांनी सांगितले.
शेलू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत गावंडे, विलास राऊत, रवी राठोड, पंचायत समिती सदस्य राजू वीरखेडे, आर्णीचे नगरसेवक छोटू देशमुख, सुनील भारती, नितीन बुटले, स्वप्नील साठे, विलास गरड, तहसीलदार सुधीर पवार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)