भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 02:47 PM2020-10-31T14:47:16+5:302020-10-31T14:49:17+5:30
Yavatmal Accident News : खडका येथील समृद्धी महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ ही घटना घडली
महागाव (यवतमाळ) - भरधाव ट्रकने दुचाकीस्वार शेतकऱ्याला धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी तालुक्यातील खडका येथील समृद्धी महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ घडली. खुशाल गभा जाधव (३२) रा.माळवागद असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ओंकार कैलास जाधव (२०) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल आणि ओंकार दुचाकीने (एम.एच.२९/बी.के.४२८३) माळवागद येथून महागावकडे येत होते. खडका येथील समृद्धी महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (डी.एल.१/जी.सी.३७६५) जोरदार धडक दिली. यात खुशाल जाधव जागीच ठार झाले. तर ओंकार जाधव गंभीर जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी ट्रकच्या समोरच्या भागात अडकून जवळपास १०० मीटर फरफटत गेली. अपघातानंतर नागरिकांनी गर्दी केली.
जखमीला नागरिकांनी उपचारासाठी महागाव येथील खासगी रुग्णालयात हलविले. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या अपघाताची माहिती कोसदणी येथील महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे, महागावचे ठाणेदार दामोदर राठोड यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेच्यावेळी उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यवतमाळकडे जात होते. त्यांनी घटनास्थळी थांबून तत्काळ पोलीस व आरोग्य विभागाला सूचना दिली. यंत्रणेला घटनास्थळी पाचारण केले.