शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून; काळी दौलत खान शिवारातील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 02:54 PM2022-11-29T14:54:59+5:302022-11-29T14:56:30+5:30
घटनास्थळी बघ्यांची गर्दी, झाडाखाली पलंगावर झोपून असताना हल्लेखोराने केले वार
महागाव / पुसद (यवतमाळ) : महागाव तालुक्यातील काळीदौलत खान शिवारात ओलीत करून झाडाखाली पलंगावर झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने महागाव आणि पुसद तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बबन वसंता राऊत (४९) रा. काळीदौ. असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी जागलीला गेले होते. तसेच कपाशीला पाणी देण्यासाठीही ते शेतात गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कपाशीला पाणी दिल्यानंतर ते शेतातच चिंचेच्या झाडाखाली असलेल्या पलंगावर झोपी गेले. गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री त्यांच्यावर कुणी तरी कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात बबन राऊत यांचा मृत्यू झाला. मात्र रात्र असल्याने ही घटना कुणालाच कळली नाही. सोमवारी सकाळी बबन यांची पत्नी पती नेहमी प्रमाणे शेतातून परत आले नाही, म्हणून शेतात पाहण्यासाठी गेली. त्यावेळी बबन राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहे.
पत्नी शेतात जाण्यापूर्वी बबन राऊत यांच्या मुलाने भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाइल बंद होता, दरम्यान सोमवारी सकाळी ही घटना माहीत पडताच गावकऱ्यांनी शेतात एकच गर्दी केली. पुसद ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक नीलेश गोपाळचावळीकर, बीट जमादार अशोक जाधव यांनी पोलिस पथकासह घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करून बबन राऊत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. दरम्यान बबन राऊत यांची हत्या कुणी व का केली असा प्रश्न पुसद ग्रामीण पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा
मृतक बबन राऊत यांचा मुलगा मनीष याने पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताचा भाऊ फरार
मृतक बबन वसंता राऊत यांचा सख्खा लहान भाऊ शिवाजी वसंता राऊत हा घटनेपासून फरार असल्याचे पोलिस निरीक्षक गोपालचावळीकर यांनी सांगितले. ग्रामीणचे ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.