खते, कीटकनाशक खरेदीकरिता पैसे नसल्याने यवतमाळमध्ये शेतकरी भावंडांनी घेतले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 08:43 PM2019-08-18T20:43:05+5:302019-08-18T20:48:41+5:30
दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
नेर (यवतमाळ) : शेतीसाठी साहित्य खरेदीच्या विवंचनेत शेतकरी भावंडांनी विषारी औषध घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता टाकळी (सलामी) येथे घडली. दशरथ नामदेव ठाकरे (३०) व घनश्याम नामदेव ठाकरे (२२), अशी त्यांची नावे आहेत. नेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले.
वडिलांच्या निधनानंतर दशरथ व घनश्याम शेती पाहत आहे. मागील काही वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पिकासाठी खते, कीटकनाशक खरेदीकरिता पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने दोघेही विवंचनेत होते. रविवारी सायंकाळी विवाहित असलेल्या दशरथने घरातच विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच घराबाहेर असलेला घनश्याम तेथे पोहचला. भावाने विष घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यानेही विषारी औषध प्राशन केले.
या दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. घनश्याम ठाकरे याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आले.