कर्जमाफीसाठी शेतक-याचा पाच तास झाडावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:55 AM2017-10-16T04:55:01+5:302017-10-16T04:55:13+5:30
सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले.
हिवरी (यवतमाळ) : सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने दाद दिली नाही. पत्नीने समजूत काढल्यानंतर मात्र तो खाली उतरला.
धनंजय राजेंद्र वानखेडे (३८) असे या शेतक-याचे नाव असून, तो दारव्हा तालुक्यातील शेंद्री डोल्हारी येथील रहिवासी आहे. या वर्षी त्याने अर्जुना येथे मक्त्याने शेत घेतले आहे. सकाळी १०च्या सुमारास तो काही महिलांसह शेतात पोहोचला. शेतातील मोठ्या झाडाला ‘आमरण उपोषण’ असे फलक बांधले आणि झाडावर चढला. सोबतच्या महिलांनी यवतमाळ-आर्णी मार्गावरील वाहतूक रोखून धरली. आपल्या मागण्यांची चिठ्ठी त्याने झाडावरून खाली फेकली. त्यात आमरण उपोषण, सातबारा कोरा करा, दहा हजार रुपये तत्काळ द्या, फवारणीच्या विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतक-यांचे पुनर्वसन करा, असे लिहिले होते.
या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार संजय डहाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळात नायब तहसीलदार नरेंद्र थुटे, मंडळ अधिकारी गुल्हाने त्या ठिकाणी आले. रुग्णवाहिका, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धनंजयला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु तो कुणाचेही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हता. कुणी वर चढल्यास मी झाडावरून उडी मारेन, असे तो सांगत होता.
धनंजयची पत्नी सावित्री हिने त्याचे मन वळवले, तसेच प्रशासनानेही सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, दुपारी २च्या सुमारास धनंजय खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
गतवर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन करीत धनंजयने विषप्राशन केले होते, तर यापूर्वी एका मोबाइल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते.
रविवारी झाडावर चढताना त्याने सोबत विषाची बाटली नेल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली होती, पण कोणतेही अघटित न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.