बोंडअळ्यांनी पीक फस्त केल्याचा धक्का बसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:54 AM2018-08-07T11:54:53+5:302018-08-07T11:58:07+5:30
शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.
:लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने झाडांवरील अळ्या उचलून खिशात भरायला सुरुवात केली. मात्र खिसा छोटा पडला. अळ्या संपता संपेना. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना महागाव तालुक्यातील भांब या गावात घडली. रामराव विठ्ठल करे (४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामराव करे यांनी यंदा सोयाबीन पेरले आहे. २९ जुलै रोजी सकाळी ते आपल्या शेतात गेले, एक एकरातील संपूर्ण सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. प्रत्येक झाडावर अळ्या दिसल्याने ते निराश झाले. पीक वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी भराभर झाडावरील अळ्या उचलायला सुरूवात केली. त्या अळ्या पुन्हा झाडावर जाऊ नये, म्हणून स्वत:च्या खिशात भरल्या. खिसा भरून गेला, तरी जिकडे पाहावे तिकडे सोयाबीनवर अळ्याच दिसत होत्या. निराशेतच रामराव घरी परतले आणि त्यांनी विषारी औषध प्राशन केले.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सोमवारी ६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई असा आप्त परिवार आहे.