यवतमाळात शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केले मटक्याचे स्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:01 PM2019-01-17T22:01:05+5:302019-01-17T22:03:00+5:30
जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग ऑपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग ऑपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू होता. राज्यमंत्री दर्जाची व्यक्ती आपल्या बाजूला बसून आहे, याचीही जाणीव जुगाऱ्यांना नव्हती.
जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका व जुगार भर घालत आहे. यामुळेच अनेक जण आत्महत्येकडे वळतात. नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी खुद्द किशोर तिवारी यांनी स्वत: स्टिंग ऑपरेशन केले. पांढरकवडा येथील आठवडी बाजार परिसरात खुलेआम मटका, जुगार आणि चेंगळ हा प्रकार सुरू होता. अनेक जण पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते. या गर्दीतच किशोर तिवारी स्वत: डाव लावणाऱ्याच्या बाजूला बसले. पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे तिवारी म्हणाले.
मटका, जुगाराला स्थानिक आमदाराचा आशीर्वाद
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदारसंघात पांढरकवडा शहर येते. मंत्र्यांनी स्थानिक पोलिसांना मटका, जुगार हद्दपार करण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा मटका, जुगार आढळल्यास उपमहासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. मात्र त्यानंतरही सर्वत्र खुलेआम मटका जुगार सुरू आहे. पांढरकवड्यात तर स्थानिक आमदाराने मटका जुगाऱ्यांची बैठक घेऊन धंदा सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप तिवारी यांनी केला.