यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंमधून साकारले फवारणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:56 PM2020-07-02T15:56:09+5:302020-07-02T16:03:42+5:30
बियाण्यांचे चढे दर, उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे पैसा वाचविण्याच्या हेतूने हरीश यांनी टाकाऊ वस्तूपासून चक्क फवारणी यंत्र तयार केले आहे.
अशोक पिंपरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तालुक्यातील रिधोरा येथील प्रयोगशील युवा शेतकऱ्याने जुगाड टेक्नॉलॉजीतून फवारणी यंत्र तयार केले आहे. त्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग केला आहे. गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीतून त्यांनी फवारणी यंत्र साकारले आहे.
हरीश मारोतराव काळे (४३) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बीकॉम द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झालेले हरीश यांनी आपल्या राळेगाव-वडकी रोडवरील रिधोरा येथील आठ एकर शेतीत विविध प्रयोग राबविले. शेतीतून अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचाच प्रयत्न हरीश करीत आहे. बियाण्यांचे चढे दर, उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे पैसा वाचविण्याच्या हेतूने हरीश यांनी टाकाऊ वस्तूपासून चक्क फवारणी यंत्र तयार केले. पाठीवर पंप घेवून फवारणी करणे अवघड जात असल्याने त्यांनी लोखंडी पाईप, प्लास्टिक पाईप, नोझल आणि एका दुचाकीचे चाक यापासून बॅटरीवर रिचार्ज होणारे फवारणी यंत्र तयार केले.
अत्यल्प खर्चात पाच तास फवारणी
या यंत्रासाठी अत्यल्प खर्च आला. या यंत्राद्वारे तब्बल पाच तास फवारणी केली जाऊ शकते. तणनाशक, कीटकनाशक, प्रवाहीत खते, टॉनिक आदींची फवारणी करण्याची क्षमता या यंत्रात आहे. एक एकरातील पीक केवळ तास भरात फवारणी केले जावू शकते. यामुळे काम सोपे होवून मजुरीचा खर्चसुद्धा वाचतो. हरीशने बनविलेल्या या फवारणी यंत्रणाची पंचक्रोशीत चर्चा आहे. तो शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करीत असतो. त्याच्या या प्रयोगाची दखल घेवून उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी यांनी भेट देवून त्यांचे कौतुक केले.
शेतीत विविध प्रयोग
युवा शेतकरी हरीश काळे आपल्या शेतीत विविध प्रयोग राबवितात. यापूर्वी त्यांनी शेतात कडकनाथ कोंबडीचे अंडे यंत्राद्वारे उगविले होते. त्या यंत्राची उगवण क्षमता ६० टक्के होती. मधुमक्षी पालन, गोट फार्म, रसवंती आदी प्रयोग त्यांनी केले. बेरोजगारीवर मात करून त्यांनी शेतीत लक्ष घातले. ‘वनामती’ येथे त्यांनी विविध प्रशिक्षण घेतले. प्रयोग करणे हा त्यांचा छंद आहे. ते शेतात कापूस, सोयाबीन, केळी, ऊस आदी पिके घेतात. रिधोरा परिसर व राळेगाव तालुक्यात प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ते ओळखले जातात.