यवतमाळचा बळीराजा पुन्हा संकटात; ढगाळ वातावरणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:44 PM2020-11-28T20:44:34+5:302020-11-28T20:44:53+5:30
Yavatmal news, agriculture यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात येते. तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना ढगाळ वातावरण आहे . यामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे .
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून तूर आणि कापूस मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात येते. तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना ढगाळ वातावरण आहे . यामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे .
खरीप हंगाम शेतकर्यांना रडविणारा ठरला आहे. आधी सोयाबीन गेले. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. कपाशीचे बोंडही घरात आले नाही. उभ्या शेतातील पीक शेतकर्यांनी काढून टाकले. यातून सावरत नाही तोच आता ढगाळी वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
नोव्हेंबर महिन्यात वातावरणात बदल झाल्याने त्याचा परिणाम तुरीवर होत आहे. दमट वातावरणामुळे थंडी गायब झाली. हवामान बदलाचा तूर पिकांना फटका बसला आहे. दरम्यानच्या कालावधीत अवकाळी पावसानेही हजेरी लावली. ढगाळी वातावरणासह धुवारीने तुर पिकांचा फुलोराही गळून पडत आहे. तूर पिकाला लागलेल्या कोवळ्या तुरीच्या शेंगात अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळत आहे. सोयाबीन, कपाशीनंतर शेतकर्यांची अपेक्षा तुरीवर होती. परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांची निराशा झाली असल्याचची व्यथा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या बोथबोडन (ता. यवतमाळ) गावातील शेतकरी अनुप चव्हाण यांनी मांडली.