शेती उपयोगी साधनांच्या भाववाढीने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:00 AM2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:03+5:30

वणी तालुक्यातील शेतीत खरिपात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढणीसाठी मागेल ती मजुरी देऊन बाहेर गावावरून मजूर आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

Farmers are fed up with the rise in prices of agricultural implements | शेती उपयोगी साधनांच्या भाववाढीने शेतकरी बेजार

शेती उपयोगी साधनांच्या भाववाढीने शेतकरी बेजार

Next
ठळक मुद्देखतांच्या किमतीत झाली तब्बल १७.३४ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लहरी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीज पुरवठा, अल्प प्रमाणात मिळणारे बँक पीक कर्ज आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेती बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. दरवर्षी शेती उपयोगी साधनांच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहेत. यामुळे शेती कशी करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
वणी तालुक्यातील शेतीत खरिपात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढणीसाठी मागेल ती मजुरी देऊन बाहेर गावावरून मजूर आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी -बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमती वाढत आहे. यंदा १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति ५० किलोच्या बॅग मागे १७.३४ टक्के वाढ केली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. डिझेलच्या किमती वाढत असल्याने ट्रॅक्टरद्वारा पीक काढणी, मळणीसह शेत मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. विजेची दरवाढ डोईजड होत आहे. दरवर्षी शेतपिकांच्या उत्पादन खर्चात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमी भाव मिळत नाही. संपूर्ण शेतमालाची शासकीय हमीभावात सीसीआय किंवा नाफेड यंत्रणेकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. म्हणून शेती व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन शासनाने शेतकरी हिताचे रक्षण करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

निसर्गाची थट्टा सुरूच
 एकीकडे शेती व्यवसाय धाेक्यात आला असताना दुसरीकडे निसर्गाचे बदलणारे चक्रदेखिल शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. कधी अति पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

व्यवस्थेच्या दृष्टचक्रात शेतकरी पिचला जात आहे. यावर्षी कर्जमाफी नाही, पीक विमा नाही, खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू आहे. परजिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याने स्थानिक मजुरांनी भरमसाठ मजुरी वाढविली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?
                       - जयसिंग गोहोकार, शेतकरी नेते. वणी.

 

Web Title: Farmers are fed up with the rise in prices of agricultural implements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती