शेतकऱ्यांनो सावधान, पुन्हा दोन दिवस पावसाचे; विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाच्या सरी
By रूपेश उत्तरवार | Published: December 4, 2023 05:50 PM2023-12-04T17:50:11+5:302023-12-04T17:51:40+5:30
अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे बाकीच असताना हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
यवतमाळ : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आंध्रासह विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यवतमाळ जिल्ह्याला दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे बाकीच असताना हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ५ आणि ६ डिसेंबरला जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू ते विदर्भापर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यातून शेतशिवाराला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वेचणीला आलेला कापूस ओला झाल्याने तो शेतकऱ्यांना वेचता आला नाही. तर अनेकांना कापूस वेचण्यासाठी मजूरच मिळाले नाहीत. या स्थितीत जर पाऊस आला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. वातावरणात झालेल्या बदलाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हरभऱ्यावर अळीचा प्रकोप झाला. आता नव्याने किडीचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तूर, हरभरा या पिकाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकरी यातून धास्तावले आहेत. एकूण शेतशिवारात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.