शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

By admin | Published: May 31, 2016 02:02 AM2016-05-31T02:02:35+5:302016-05-31T02:02:35+5:30

सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर अशा परिस्थितीत पीककर्जासाठी शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

Farmers in the cyclone of private banks | शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात

Next

यवतमाळ : सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर अशा परिस्थितीत पीककर्जासाठी शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात अडकत आहे. या बँका कर्ज तर देतात मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना डांबून ठेवणे, मारहाण करणे असे प्रकारही करतात. एक हप्ताही थकला तरी घरावर नोटीस लावून शेतकऱ्याची बदनामी करतात. असाच प्रकार दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथे घडला. या प्रकाराने अपमानित झालेल्या शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच विष प्राशन केले. यामुळे खासगी बँकांच्या वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अपुरा पाऊस आणि सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेचे कर्ज मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांवर थकीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांचे दरवाजे बंद झाले आहे. या शेतकऱ्यांना खासगी बँकांचा आधार घ्यावा लागतो. अल्प मुदती कर्ज या बँका शेतकऱ्यांना देतात. त्यासाठी चढा व्याजदरही आकारला जातो. परंतु गरजवंत शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. त्यामुळे तो व्याजाकडे न पाहता कर्ज घेतो. परंतु त्या कर्जाचा हप्ता थकला की या बँकांचे वसुली कर्मचारी घरी येतात. धमकी देऊन पैशाची वसुली करतात. घरावर नोटीस लावतात. एवढेच नाही तर घरावर मोठ्या अक्षरात हे घर संबंधित बँकेला गहाण असल्याचे लिहितात. यामुळे शेतकरी अपमानित होतो.
दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथील धनंजय वानखडे या शेतकऱ्यासोबतही असाच प्रकार झाला. त्याने महिंद्र फायनान्सकडून घेतलेल्या एक लाख रुपयाच्या कर्जाचा केवळ एक हप्ता थकला. बँकेने तगादा लावून त्याच्या घरावर नोटीस लावली. हा प्रकार सांगण्यासाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वीच त्याने कक्षासमोर विषाचा घोट घेतला. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वीही जिल्ह्यात असे प्रकार घडले आहे. काही महिन्यांपूर्वी महिंद्रा कंपनीने घाटंजी तालुक्यातील एका शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी डांबून ठेवले होते. त्याला मारहाणही करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार झाली. परंतु पुढे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. असाच प्रकार नेर येथे घडला होता. मोहन चौधरी या शेतकऱ्याला महिंद्रा फायनान्सच्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. असे अनेक प्रकार या खासगी बँकांकडून जिल्ह्यात सुरू आहे. परंतु त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. एकीकडे जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानाचा डांगोरा पिटविला जात आहे. शेतकऱ्यांना थेट मदत केल्याचा कांगावा प्रशासन करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाल्याची आकडेमोड करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकरी खासगी बँकांच्या चक्रव्यूहात अडकले आहे. (नगर प्रतिनिधी)

४जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दारव्हा तालुक्यातील शेंद्री (बु) येथील धनंजय राजेंद्र वानखडे या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर ही वेळ का आली, या बाबत सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पोलीस विभागाला दिले. धनंजय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी खासदार आणि सीईओसोबत अपंगांच्या प्रश्नावर चर्चा करीत होते. त्यावेळी ही घटना घडली. सदर युवकाच्या तक्रारीत सुरज गोविंद देवरे याने केलेली फसवणूक आणि महिंद्रा फायनान्स कंपनीकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्याचे म्हटले आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. खासगी सावकारी किंवा खासगी व्यक्तीने पैसे घेवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही व्यक्तीने टोकाचा निर्णय न घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

दलालाकडून
९६ हजारांनी फसवणूक
४दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथील प्रमोद भोयर, छगन वानखडे, सुरेश भागने, प्रल्हाद वानखडे, रत्नाबाई भोयर, सुरेश चौधरी आदी शेतकऱ्यांची पीककर्ज देतो म्हणून तब्बल ९६ हजारांनी फसवणूक करण्यात आली. सुरज गोविंदराव देवरे याने अ‍ॅक्सिस बँकेचा एजंट असल्याची बतावणी करून फसविले. काही शेतकऱ्यांना पीककर्जाचे चेकही दिले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत निकड असते. त्यामुळे मिळेल तेथून पैसा उपलब्ध करण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. याचाच फायदा घेत गावागावात दलाल सक्रिय झाले आहे. बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करीत आहे. पीककर्ज तर मिळत नाही, उलट शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसतो. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अडचण हेरून असे दलाल सक्रिय आहे.

Web Title: Farmers in the cyclone of private banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.