स्वराज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:15 PM2019-02-17T22:15:35+5:302019-02-17T22:16:30+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. स्वराज्यात शेतकरी समृद्ध, तर सामान्य माणूस आनंदाने नांदत होता. सर्वधर्माचा आदर करणाºया स्वराज्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही, हेच शिवरायांच्या इतिहासातील वास्तव असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी केले.
येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीतर्फे शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगमधील राजमाता जिजाऊ परिसरात आयोजित ‘शिवपर्व-२०१९’ व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजे-इतिहासातील वास्तव’ या विषयावरील पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर होते. जगतगुरु संत तुकाराम महाराज विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशमुख, प्रा.संजय खुपासे, राजेश साळुंके, बाळासाहेब साबळे, दिगांबर जगताप, अशोक बाबा, प्रा.पंडित देशमुख, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
प्रथम आसावरी पवार या चिमुकलीने ‘जिजाऊ वंदना’ सादर केली. साची ठाकरे हिने ‘मी जिजाऊ बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग, तर चिन्मय कदम याने शिव चरित्रावर प्रभावी भाषण दिले. अध्यक्षीय समारोप करताना राम देवसरकर यांनी विविध क्षेत्रात बहुजन तरुणांनी उंच भरारी मारण्याचे आवाहन केले. संचालन शशिकांत जामगडे, तर प्रा.गजानन जाधव यांनी आभार मानले. यावेळी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, प्रा. प्रकाश लामणे, यशवंत चौधरी, राजेंद्र भिताडे, साकिब शहा, प्रभाकर टेटर, नितीन पवार, सुशांत महल्ले, हरिभाऊ ठाकरे आदी उपस्थित होते. शहर व परिसरातील शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
सोमवारी वावगे यांचा कार्यक्रम
शिवपर्व-२०१९ मध्ये सोमवार, १८ फेब्रुवारीला प्रशांत वावगे व रश्मी वावगे यांचा ‘मी छत्रपती शिवाजी होणारच’ या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी विशेष प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. मात्र छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीने सोमवारी आयोजित सायकल रॅली व शोभायात्रा रद्द केली आहे. त्याऐवजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवराय यांचे पूजन व शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.