विषाची बॉटल घेऊन शेतकरी जिल्हा कचेरीत
By admin | Published: May 2, 2017 12:01 AM2017-05-02T00:01:10+5:302017-05-02T00:01:10+5:30
शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला.
धुऱ्याचा वाद : बंदोबस्तावरील पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
यवतमाळ : शेताच्या धुऱ्याचा वाद तक्रार करूनही सुटत नसल्याने उद्विग्न झालेल्या बाभूळगाव तालुक्यातील वृद्ध शेतकऱ्याने विषाची बॉटल घेऊन थेट जिल्हा कचेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र दिनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. गत पाच दिवसात चौघांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाची चांगलीच पाचावरधारण बसली आहे.
पंजाबराव शामराव थाळे (८७) रा. सौजना ता. बाभूळगाव असे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बाभूळगाव तालुक्यातील सीमेवरील कासारखेड शिवारात पाच एकर शेती आहे. लगतच्या शेतकऱ्याने त्यांच्या धुऱ्यावरील कडूनिंबाचे झाड तोडून अतिक्रमण केले. तसेच त्यांच्या शेताचा बांधही फोडला. या प्रकाराची तक्रार पंजाबरावने प्रशासनाकडे केली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा कचेरीत लोकशाही दिन असतो. याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते सोमवारी सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र महाराष्ट्र दिन असल्याने शासकीय सुटी होती. मात्र महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध आंदोलने होणार हे गृहित धरुन जिल्हा कचेरीसमोर सोमवारी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पंजाबराव तेथे पोहोचताच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपबिती सांगितली. पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या पिशवीत विषाची बॉटल आढळून आली. विषाची बॉटल दिसताच पोलीस सतर्क झाले. त्यांनी तत्काळ पंजाबराव घेऊन शहर ठाणे गाठले. तेथे त्यांची समजूत काढण्यात आली.
विषाची बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय आत्महत्या न करण्याचे हमीपत्रही घेण्यात आले. लागोपाठ विष प्राशनाच्या घटना जिल्हा कचेरीत घडत असल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. सोमवारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.
(कार्यालय प्रतिनिधी)
पाच दिवसातील तिसरी घटना
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी घडलेली तिसरी घटना होय. पाच दिवसापूर्वी दारव्हा तालुक्यातील डोल्हारीदेवी येथील तीन गौतम बंधूंनी शेतीच्या वादात जिल्हाधिकारी कक्षाच्या बाहेर विष प्राशन केले होते. त्यापैकी कुंदन रामचंद्र गौतम याचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळत नाही तोच रविवारी सायंकाळी ४.३० वाजता दारव्हा तालुक्यातील बानायत येथील संतोष शालीकराम शिंदे (३५) या युवकाने जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केले. तर सोमवारी बाभूळगाव तालुक्यातील पंजाबराव थाळे विषाची बॉटल घेऊन जिल्हा कचेरीत पोहोचला. सातत्याने विष प्राशनाच्या घटना घडत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.