‘मोदी सरकार’ म्हणत मरणाऱ्या शेतकऱ्याचे कुटुंब वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:25 PM2018-04-28T15:25:39+5:302018-04-28T15:25:48+5:30
मरता-मरता पंतप्रधानांच्या धोरणावर बोट ठेवून गेलेल्या या शेतकऱ्याची आत्महत्या शासकीय मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अवघ्या १६ वर्षांची मुलगी रोज १५ किलोमीटर येणे-जाणे करून एका सराफा दुकानात मजुरी करतेय. ६ वर्षांचा मुलगा सतत आजारी असून त्याच्या उपचाराचा गंभीर प्रश्न पत्नीपुढे उभा ठाकला आहे.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘मोदी सरकार’ असे लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची सहा महिन्यातच वासलात लागली आहे. मरता-मरता पंतप्रधानांच्या धोरणावर बोट ठेवून गेलेल्या या शेतकऱ्याची आत्महत्या शासकीय मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अवघ्या १६ वर्षांची मुलगी रोज १५ किलोमीटर येणे-जाणे करून एका सराफा दुकानात मजुरी करतेय. ६ वर्षांचा मुलगा सतत आजारी पडत असून त्याच्या उपचाराचा गंभीर प्रश्न पत्नीपुढे उभा ठाकला आहे.
प्रकाश प्रभाकर मानगावकर (रा. टिटवी ता. घाटंजी) हा ४५ वर्षांचा तरुण शेतकरी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गळफास लावून गेला. सागाच्या दोन पानावर त्याने ‘मोदी सरकार कर्जासाठी आत्महत्या’ असे शब्द लिहून ठेवले होते. या शब्दांनीच तेव्हा भल्या भल्या राजकीय पुढाऱ्यांना टिटवी गावापर्यंत येण्यास भाग पाडले होते. शासकीय मदत, शासकीय नोकरी अशी आश्वासने मिळाल्याने प्रकाशची पत्नी विद्या, मुलगी धनश्री, मुलगा शिवम आणि वृद्ध आई मंदाकिनी यांना आशा वाटली.
प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. प्रकाशवर पीक कर्जासोबतच वाहनकर्ज, गृहकर्ज होते. त्यामुळे त्याचे वारस शेतकरी आत्महत्येत मिळणाऱ्या मदतीला पात्र नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्पष्ट केले. परंतु, खासगी कर्ज फेडण्यासाठी आधीच माझ्या पतीने शेती विकली होती. त्यांनी आत्महत्या केली ती पीककर्जाच्या चिंतेतूनच, असा आक्रोश विद्या मानगावकर करीत आहे. पण कुणी ऐकायला तयार नाही.
आता १६ वर्षांची धनश्री घर चालविण्यासाठी मजुरी करते. टिटवी गावातून रोज घाटंजीपर्यंत जाते. तेथील एका सराफा दुकानात धनश्री दागिने चमकविते. पण खुद्द तिचेच आयुष्य सरकारी बेरकेपणापायी काळवंडले आहे. सहा वर्षांचा शुभम सतत आजारी पडतोय. त्याला दर दोन-तीन महिन्यांनी आठ-दहा दिवस यवतमाळच्या दवाखान्यात ‘अॅडमिट’ करावे लागत आहे. वृद्ध आई मंदाकिनीबाई यांना केवळ सुनेचा आधार आहे. पण तिच्या हाती सरकारी यंत्रणेकडे पदर पसरण्यापलिकडे काहीच नाही.
प्रकाशने अखेरच्या क्षणी ‘अच्छे दिन’ दाखविण्याची भाषा करणाऱ्या ‘मोदी सरकार’चा नामोल्लेख केला. तरीही सरकारी यंत्रणेने आता त्याची आत्महत्याच शेतकरी आत्महत्या नसल्याचा अहवाल दिला. प्रकाशच्या कलेवरापुढे मदतीचे आश्वासन देणारे राजकीय पुढारीही आता कुठे गुल झाले, हे विद्या प्रकाश मानगावकर या विधवेला कळेनासे झालेय.
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
पतीच्या आत्महत्येनंतर मानगावकर कुटुंब उघड्यावर आले आहे. अखेर प्रकाशची पत्नी विद्याने गुरुवारी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपबिती मांडली. माझ्या पतीने कर्जापायीच आत्महत्या केली, हे तिने पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीच्या अहवालात हे प्रकरण शासकीय मदतीस पात्र ठरविण्यात आले होते. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालातही मदतीस पात्र असे नमूद आहे. परंतु नंतर हे अहवाल बदलण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व अहवाल बाजूला सारून पोलिसांना मी दिलेले बयाण बदलून घेण्यात आले. या बनावट बयाणाचा आधार घेत माझ्या पतीची आत्महत्या मदतीस अपात्र ठरविण्यात आली, असा आरोप विद्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. प्रशासनाने प्रकाशची आत्महत्या अपात्र ठरविली, कारण ती आत्महत्या नसून सरकारने केलेला खूनच आहे, अशी टीका शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी केला.
माझ्या पतीने मरण्यापूर्वी सागाच्या पानावर ‘मोदी सरकार कर्जासाठी आत्महत्या’ असे लिहून ठेवले होते. एखादा व्यक्ती मृत्यूच्या क्षणी जे बोलतो किंवा लिहून ठेवतो ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. परंतु इथे मोदी सरकारचे नाव वाचविण्यासाठीच आमचे प्रकरण शासकीय मदतीसाठी जाणीवपूर्वक अपात्र ठरविले जात आहे. आता माझ्यावरही आत्महत्येचीच वेळ येणार आहे.
- विद्या प्रकाश मानगावकर, मृत शेतकऱ्याची पत्नी