कृषीपंप चोरट्यांची शेतकऱ्यांत दहशत
By admin | Published: November 6, 2014 02:20 AM2014-11-06T02:20:42+5:302014-11-06T02:20:42+5:30
यवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली.
शिवानंद लोहिया हिवरी
यवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली. मात्र एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. मोटरपंप चोरणारे रॅकेटच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सक्रीय आहे. ते मोटरपंपाबरोबर केबल, सिंचनासाठी ठेवलेले पाईप याच साहित्यावर डल्ला मारत असल्याचेही अनेक घटनांवरून दिसून येते. असे असताना ग्रामीण भागात पोलिसांची नेमकी गस्त होते कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात मोटरपंप चोरणाऱ्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्याचे मोटरपंप चोरीस गेल्याचे लक्षात आले. मात्र कोर्टकचेरीच्या भानगडीत कोण पडेल म्हणून त्याने याची पोलिसात तक्रार केली नाही. शेतामधील मोटरपंप चोरण्यापूर्वी जिवंत विद्युत पुरवठ्याची केबल तोडायची, त्यानंतर एका साथीदाराला विहिरीत उतरवून दोराच्या सहाय्याने ही मोटर बाहेर काढायची. त्यानंतर शेताच्या बाहेर ठेवलेल्या दुचाकीवरून ती लंपास करायची, अशी या चोरट्यांची मोडस आॅपरेंडी आहे. मोटरपंपाबरोबरच स्प्रिंकलर पाईप, नोझल, वीज पुरवठ्याची केबल, रोहित्रातील आॅईल आदी साहित्यही हे चोरटे लक्ष्य करीत आहेत. आता तर गोठ्यातील जनावरे चोरून नेण्याचाही सपाटा त्यांनी चालविला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाने पिके धोक्यात येतात. गेल्या काही वर्षात दरवर्षीच ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकांनी कर्ज करून, पोटाला चिमटा घेवून एकेक पैसा गोळा करीत सिंचनाचे साहित्य खरेदी केले.