शेतकऱ्याने मजुरांना मोफत वाटले १५ क्विंटल गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:22+5:30
रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमार ओढावली आहे. या मजुरांना दोन ...
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमार ओढावली आहे. या मजुरांना दोन घास अन्न मिळावे म्हणून दारव्हा तालुक्यातील चाणी येथील शेतकरी श्रावण राठोड यांनी आपल्या शेतात काढणी झालेला गहू मजुरांना वाटून दिला. ४५० ते ५०० गरजवंतांना १५ क्विंटल गव्हाचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनचा फटका गावापासून शहरापर्यंत सर्वांनाच बसला आहे. रोजमजुरीसाठी शहराकडे धाव घेणारे शेतमजूर आता घरी बसले आहे. दोन वेळचे अन्न कसे मिळावे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ही स्थिती पाहता श्रावण राठोड यांनी मजुरांना गहू देण्याचा निर्णय घेतला. शेतात काढणी झालेला गहू प्रशासनाच्या उपस्थितीत वाटण्यात आला.
श्रावण राठोड यांनी सव्वा दोन एकरात गव्हाची लागवड केली. त्यांना २० ते २५ क्विंटल गहू झाला. त्यांनी प्रत्येक गरजवंताला पाच किलो याप्रमाणे ४५० व्यक्तींना गव्हाचे वितरण केले. मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत या गव्हाचे वितरण करण्यात आले. शेतातील अन्न गरजवंताच्या कामी आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. याच पद्धतीने प्रत्येकाने मदत करावी, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राठोड यांच्या शेतात सर्व गरजवंतांनी ‘सोशल डिस्टन्स’ ठेवत हा गहू मिळविला. प्रत्येक जण रूमाल, मास्क बांधून ठराविक अंतरावर उभे होते. यावेळी कृषी सहाय्यक पी.एस. बोइनवाड, तालुका कृषी अधिकारी थोरात, मंडळ अधिकारी दीपक मडावी, तलाठी स्वाती गजभिये, सरपंच विद्या नामदेव ठोकळ, उपसरपंच सुरेश शाहू, पोलीस पाटील वृंदा मडावी, विनोद पजगाडे, मयूर घोडाम, विलास राठोड उपस्थित होते.