कर्जमाफीसाठी शेतकरी हमीपत्र मोहीम
By admin | Published: April 20, 2017 12:35 AM2017-04-20T00:35:23+5:302017-04-20T00:35:23+5:30
शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील
संभाजी ब्रिगेडचा पुढाकार : शासनाला देणार अल्टिमेटम
यवतमाळ : शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकडून लिहून घेण्याचा उपक्रम संभाजी ब्रिगेडकडून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व हमीपत्रे मुख्यमंत्र्यांना दाखवून कर्जमाफीसाठी त्यांना अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
सत्ताधारी व विरोधी दोन्ही घटक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संभाजी ब्रिगेडकडून ही मोेहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून शासनाने कर्जमाफी केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. हे लाखो हमीपत्र मुख्यमंत्र्यांना भेटून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या व इतर शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे हे हमीपत्र लिहून द्यावे, असे आवाहनसुद्धा केले आहे.
पत्रपरिषदेला संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ विधानसभा अध्यक्ष बिपिन चौधरी, शहरप्रमुख अमित नारसे, शितल साळुंके, देवेंद्र कळसकर, मयुरी कदम, आकाश चंदनखेडे, प्रवीण देशमुख, कैलास भोयर, पराग पाटील, मयुरी देशमुख, प्रियंका शेंडे, डॉ. प्रशांत रोकडे, यशवंत इंगोले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
शितल हुंडाविरोधी पथक
लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शितल वायाळ या शेतकरी कुटुंबातील युवतीने हुंड्यामुळे आपला विवाह मोडत असल्याच्या काळजीतून आत्महत्या केली. समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडकडून ‘शितल हुंडा विरोधी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारा सर्व समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी जनजागृती आणि प्रयत्न करण्यात येणार आहे. जिथे कुठे हुंड्याची देवाण-घेवाण होत आहे आणि ही माहिती जो कुणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच देईल, त्याला पाच हजार रुपये रोख बक्षिसही देण्यात येईल, अशी माहिती बिपिन चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.