शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे धनादेश
By admin | Published: March 6, 2015 02:15 AM2015-03-06T02:15:20+5:302015-03-06T02:15:20+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचे वितरण येथील तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले.
उमरखेड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचे वितरण येथील तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष नितीन भुतडा होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार एस.डी. पाईकराव, गजानन मोहाळे, रमेश चव्हाण, रितेश गिरी, डॉ.अविनाश वजिराबादे, इम्रान खान, रायवार उपस्थित होते. रेखाबाई बाळू भुसारे (आकोली), सविता विजय पवार (बालापूर), वंदना परमानंद राणे (दिघडी), सविता मारोती राठोड (निंगनूर) या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील निराधार महिलांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. तसेच उमरखेड तालुक्यातील निराधार विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून मंजूर झालेल्या २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये असे चार लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. घराचा कर्ता व्यक्ती गेल्यावर उर्वरित कुटुंब निराधार होवू नये यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत देण्यात येत असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)