चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 09:52 PM2022-10-19T21:52:57+5:302022-10-19T21:54:24+5:30
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर ग्रामसेवकांनी चार तालुक्यांमध्ये कामच केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी त्यांना आंदोलन करण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनावर संताप नोंदविला.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, घाटंजी आणि नेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत गोळा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी कोऱ्या याद्या दिल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत दिवाळी तोंडावर असताना मदत मिळाली असतील तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही. यावर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, सुरेश चिंचोळकर, दत्तकुमार दरणे, आनंदराव जगताप, प्रा. घनश्याम दरणे, प्रा. विजय गाडगे, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, अरुण राऊत, अशोक बोबडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शेतकऱ्यांना उभे राहायलाही जागा नाही
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी जागाही असावी लागते. यवतमाळात आंदोलनासाठी जागाच नाही. तिरंगा चाैकात पार्किंगची व्यवस्था आहे तर आझाद मैदानात फटाक्याची दुकाने आहे. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन केले.