निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे प्रश्न राहिले दुर्लक्षितच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:45 PM2024-11-18T16:45:38+5:302024-11-18T16:47:05+5:30
शेतकऱ्यांची अडवणूक : सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पावसाने मारलेली दडी, अतिवृष्टी व परतीच्या पावसाने केलेले नुकसान, यातून सावरून शेतकरी सध्या शेतातील सोयाबीन, कापूस काढणीवर भर देत आहे. कापूस व सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत; परंतु त्यांच्या प्रश्न व मागण्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
लोकप्रतिनिधी, राजकीय व शेतकरी नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. कापूस, सोयाबीनची हमीभावापेक्षा कमीने खरेदी करून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तालुक्यात कुठेही शासनाची खरेदी सुरू झाली नाही किंवा शासनाची कापूस व सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शेतकरी नेता करताना दिसून येत नाही. सत्ताधारी पक्षाची मते कमी न व्हावी म्हणून नाफेडची सोयाबीन व सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात येत असल्याचे भासवून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यास लावण्यात येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एका महिन्यापूर्वी सोयाबीन विक्री करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी केली आहे; परंतु सोयाबीनची शासकीय खरेदी काही सुरू करण्यात आलेली नाही.
कापसाच्या बाबतीतसुद्धा तेच धोरण अवलंबिण्यात आल्याचे दिसून येत आहे. सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सांगत बाजार समितीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन केले होते; परंतु सीसीआयची कापूस खरेदी केव्हा सुरू होणार, याचे उत्तर बाजार समितीचे सचिव किंवा प्रशासक देऊ शकत नाही. खरं तर बाजार समितीच्या वतीने हमीभावापेक्षा कमीने सोयाबीन व कापसाची खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर दंडात्मक तथा फौजदारी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीबाबत चुप्पी
२० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेद- वारांच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणे ठोकण्यात येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांद्वारे होत असलेल्या लुटीबाबत कोणताही उमेदवार ब्र काढताना दिसून येत नाही.