यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन
By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2024 15:18 IST2024-09-07T15:17:02+5:302024-09-07T15:18:14+5:30
गळ्यात कापूस-साेयाबीनची माळ : शेतमालाच्या भाववाढीची केली मागणी

Farmers laid siege to the Guardian Minister in Yavatmal; Garland of cotton and soybean trees around the neck
यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठाेड शहरातील समता मैदानात शनिवारी गणपती खरेदी करत असताना, त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. कापूस व साेयबीनचे भाव वाढविण्याची मागणी केली. या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून साेशल मिडियात शेतमालाच्या भाववाढीची माेहीम उघडली आहे. याअंतर्गतच शेतकऱ्यांनी कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात घालून आंदाेलन केले.
जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीसह अनेक नैसर्गिक संकटांनी त्रस्त झाला आहे. शासन अशाही स्थितीत शेतमालाचा भाव वाढवावा म्हणून प्रयत्न करताना दिसत नाही. शासानाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी साेशल मिडियावर माेहीम उघडली आहे. मंत्री संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या भाववाढी संदर्भात निर्दशने केली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील.अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मंत्री संजय राठाेड यांच्या समाेर व्यक्त केली.
सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदेालन सुरू आहे. या आंदाेलनाची सुरूवात काॅग्रेसच्या सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या आंदाेलनात शेतकरी प्रकाश कांबळे,अनिल चवरे,अभय अनासाने,अतुल झोपाटे,कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे,नरेश खोब्रागडे,सचिन मनवर यांच्यासह माेठ्यासंख्येने शेतकरी उपस्थित हाेते.
शासनाला ११ सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम
"जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही,त्यांच्या मागणीची पूर्तता होणार नाही,तोवर अशाच पद्धतीची प्रदर्शने,निदर्शने चालूच राहतील.येत्या ११ सप्टेंबर पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर जिल्ह्यात माेठे जन आंदोलन जिल्हाभर उभारण्यात येईल"
- प्रा. पंढरी पाठे, शेतकरी नेते.